लंडन : भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीने विद्यमान विजेत्या भारतीय संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात आज येथे न्यूझीलंड संघावर डवकर्थ लुईस नियमाच्या आधारे ४५ धावांनी मात केली.भुवनेश्वर कुमार आणि शमी यांच्या वेगवान आणि अचूक टप्प्यावरील स्विंग गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला ३८.४ षटकांत १८९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भुवनेश्वर व शमी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने ३ बाद १२९ धावा केल्या. या धावसंख्येवरच पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा कोहली ५२ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी १७ धावांवर खेळत होते. सलामीवीर शिखर धवनने ४0 धावा केल्या.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडतर्फे केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात सलामीवीर ल्युक रोंचीने सर्वांधिक ६६ धावांची खेळी केली तर अष्टपैलू जेम्स नीशाम ४६ धावा काढून नाबाद राहिला. या लढतीत उभय संघाचे प्रत्येकी १३ खेळाडू खेळू शकतात, पण केवळ ११ खेळाडूंना फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी आहे. न्यूझीलंडसाठी नाणेफेक वगळता काहीच सकारात्मक घडले नाही. विराट कोहलीने शमी व हार्दिक पांड्या यांना नव्या चेंडूने मारा करण्याची संधी दिली. पांड्याला छाप सोडता आली नाही, पण शमीने मात्र सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. रोंचीने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्राही स्वीकारला होता. शमीने वैयक्तिक दुसऱ्या षटकात अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर मार्टिन गुप्तीलला (९) मिड आॅफवर झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन (८) व नील ब्रुम (०) यांना सलग चेंडूंवर माघारी परतवले. रोंची वैयक्तिक २६ धावांवर असताना बुमराहच्या गोलंदाजीवर झेल अश्विनला टिपण्यात अपयश आले. पुढच्या षटकात रोंचीने शमीच्या गोलंदाजीवर दोन चौकार व मिडविकेटला षटकार ठोकला. शमीने या षटकात विलियम्सन व ब्रुम यांना तंबूचा मार्ग दाखविला. धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्टील झे. भुवनेश्वर गो. शमी ०९, ल्युक रोंची त्रि. गो. जडेजा ६६, केन विलियम्सन झे. रहाणे गो. शमी ०८, नील ब्रुम झे. धोनी गो. शमी ००, कोरी अँडरसन त्रि. गो. भुवनेश्वर १३, मिशेल सँटनर झे. जडेजा गो. अश्विन १२, कोलिन डी ग्रँडहोम यष्टिचित धोनी गो. जडेजा ०४, जेम्स नीशाम नाबाद ४६, अॅडम मिल्ने झे. धोनी गो. यादव ०९, टीम साऊदी त्रि. गो. भुवनेश्वर ०४, ट्रेंट बोल्ट झे. शमी गो. भुवनेश्वर ०९. अवांतर (९). एकूण ३८.४ षटकांत सर्वबाद १८९. गोलंदाजी : शमी ८-०-४७-३, पांड्या ६-०-४९-०, बुमराह ४-०-१४-०, भुवनेश्वर ६.४-१-२८-३, जडेजा ४-०-८-२, अश्विन ६-०-३२-१, यादव ४-०-११-१.भारत : अजिंक्य रहाणे झे. बोल्ट गो. साउथी ७, शिखर धवन झे. अँडरसन गो. निशाम ४0, विराट कोहली नाबाद ५२, दिनेश कार्तिक झे. सँटेनर गो. बोल्ट 0, महेंद्रसिंह धोनी नाबाद १७. अवांतर : १३. एकूण : २६ षटकांत ३ बाद १२९. गोलंदाजी : साउथी ७-0-३७-१, बोल्ट ७-१-३४-१, मिल्ने ४-0-२0-0, निशाम ३-0-११-१, ग्रँडहोम ५-0-२२-0.धोनीला संगकाराचा विक्रम मोडण्याची संधीमहेंद्रसिंग धोनीला श्रीलंकेचा कुमार संगकाराला पिछाडीवर सोडत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम यष्टिरक्षक होण्याची संधी आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ३३ बळी घेतले आहेत, पण भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याला आव्हान देत असल्याचे निदर्शनास येते. धोनीने आतापर्यंत ११ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. त्यात ११ झेल व ४ यष्टिचितचा समावेश आहे. संगकाराने २२ सामन्यांत ३३ बळींची नोंद केली आहे. त्यात २८ झेल व पाच यष्टिचितचा समावेश आहे. एम.एस. धोनीला संगकाराचा विक्रम मोडण्यासाठी १९ बळींची गरज आहे.जर धोनीने अशी कामगिरी केली तर तो या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक ठरेल. सर्वाधिक बळी घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये संगकारानंतर अॅडम गिलख्रिस्टचा (२५ बळी, २३ झेल, २ यष्टिचित) क्रमांक आहे पण, गिलख्रिस्टने यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली आहे.
भारताची न्यूझीलंडवर मात
By admin | Published: May 29, 2017 12:43 AM