ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. १२- आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरलेल्या भारतीय संघाने आज २५ व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा ५-१ अशा फरकाने पराभव करत आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. जेतेपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानवर विजय मिळवणे आवश्यक असताना आज भारताने आपला खेळ उंचावला. पाच वेळेचा विजेता भारताने मागच्या वर्षी कांस्यपदक जिंकले होते. सरदारासिंग याच्या नेतृत्वाखालील संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकवर विजय नोंदवित अझलन शाह कप स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
पहिल्या सत्रातील चौथ्याच मिनिटाला भारताच्या मनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढील तीन मिनिटांतच पाकिस्तानकडून गोल झाल्याने १-१ अशी बरोबरी साधली गेली आहे. मात्र ही बरोबरी जास्त काळ टिकू शकली नाही. १०व्या मिनिटाला मनप्रीतच्या पासवर एसव्ही सुनीलने भारताच्या खात्यात आणखी एका गोलची भर टाकली आणि आघाडी वाढवली.
दुसऱ्या सत्रात एकाही संघाला गोल करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या सत्रात ४१व्या मिनिटाला एस. व्ही. सुनीलने आणखी एक गोल केला आणि आघाडी आणखी वाढवली. चौथ्या सत्रात ५० आणि ५४व्या मिनिटाला भारताच्या हॉकीपटूंनी गोल करत पाकिस्तानवर ५-१ असा विजय मिळवला.