कोलंबो : भारताची श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याची गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आज अखेर संपली. तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यात भारताने मंगळवारी श्रीलंकेचा ११७ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय साकारला. श्रीलंकेचा कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूज(११०) व कुशाल परेरा (७०) यांनी सहाव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करीत भारताला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले; पण अखेर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला इतिहास नोंदविण्यापासून रोखण्यात त्यांना अपयश आले. श्रीलंका संघाने अखेरच्या सहा विकेट २६ धावांच्या मोबदल्यात गमाविल्या. ३८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा दुसरा डाव २६८ धावांत संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विनने ६९ धावांच्या मोबदल्यात ४, तर ईशांत शर्माने ३२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने यापूर्वी १९९३ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत १-० ने मालिका जिंकली होती. मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने प्रथमच केला आहे. श्रीलंका संघाने गॉलमध्ये पहिला कसोटी सामना ६३ धावांनी जिंकला होता, तर भारताने यानंतर पी.सारा ओव्हल मैदानावर दुसऱ्या लढतीत २७८ धावांनी विजय मिळविला. भारताने यापूर्वी २००१ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिली लढत गमाविल्यानंतर २-१ ने विजय मिळवला होता. परेराची चहापानाच्या विश्रांतीपूर्वी एकाग्रता भंग झाली. भारताने तिसऱ्या सत्रात नव्या चेंडूने सुरुवात केली. मॅथ्यूज तिसऱ्याच चेंडूवर तंबूत परतल्यानंतर भारताच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. अश्विनने परेराला बाद करीत श्रीलंकेला सहावा धक्का दिला, तर ईशांतने मॅथ्यूजची संघर्षपूर्ण खेळी संपुष्टात आणताना कसोटी क्रिकेटमध्ये आपला २०० वा बळी नोंदवला. भारताने नव्या चेंडूने केवळ पाच षटकांमध्ये उर्वरित चार विकेट घेतल्या. चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना पुजाराने पहिल्या डावात सलामीला खेळताना नाबाद १४५ धावांची खेळी केली. श्रीलंकेने कालच्या ३ बाद ६७ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. ईशांत शर्माने दिवसाच्या पहिल्याच षटकात मॅथ्यूजला बाद केले होते, पण तो नोबॉल होता. भारताला ही भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी फार वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. मॅथ्यूजचा सहकारी कौशल सिल्वाला संयमी खेळी करण्यात अपयश आले. उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल शॉर्ट मिडविकेटला चेतेश्वर पुजाराने टिपला. त्याने मॅथ्यूजसोबत चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. लाहिरू थिरिमानेला (१२) लौकिकाला साजेशी फलंदाजी करण्यात अपयश आले. आश्विनच्या गोलंदाजीवर थिरिमानेचा उडालेला झेल सिली पॉर्इंटवर तैनात के. एल. राहुलने टिपला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेराने संयमी फलंदाजी केली. श्रीलंकेने पहिल्या सत्रात केवळ ६७ धावा फटकावल्या आणि दोन विकेट गमाविल्या. दुसऱ्या सत्रात मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करीत ११५ धावा वसूल केल्या आणि केवळ एक विकेट गमावली. मॅथ्यूज व परेरा यांनी एकेरी व दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. संधी मिळाली तर चेंडूला सीमारेषा दाखविण्यास त्यांनी चूक केली नाही. परेरा पदार्पणाच्या कसोटीत दोनही डावांत अर्धशतके झळकाविणारा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला. यापूर्वी दिनेश चंडीमलने हा पराक्रम केला आहे.मॅथ्यूज वैयक्तिक ९३ धावांवर असताना अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंचांनी त्याच्याविरुद्धची पायचितची अपील फेटाळून लावली. त्यानंतर त्याने स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध चौथ्या डावात शतकी खेळी करणारा मॅथ्यूज श्रीलंकेचा दुसरा कर्णधार ठरला. (वृत्तसंस्था)------------------------------विजयी मार्च पास्टमध्ये ईशांत व पुजारा सर्वांत पुढेश्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय साकारल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात संघाच्या ११७ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा चेतेश्वर पुजारा व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना सामन्यानंतर सर्वांत पुढे चालण्यास सांगितले. एसएससी मैदानावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय साकारल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना कर्णधार विराटच्या एका हातात स्टम्प होता आणि सोबतच त्याने पुजारा व ईशांत यांना सर्वांत पुढे चालण्याची सूचना केली. विराटने या कृतीद्वारे कर्णधार म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालणार असल्याचे संकेत दिले आणि कर्णधार म्हणून परिपक्व असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे त्याने भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या दोन मुख्य खेळाडूंना संघाच्या पुढे चालण्यास सांगितले. विराटने सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात धनादेश आणि मालिका विजयाचा चषक स्वीकारला.--------------------------मालिका विजयानंतर आयसीसी मानांकनात भारताचे स्थान सुधारलेश्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ऐतिहासिक विजयानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने महत्त्वपूर्ण मानांकन गुणांची कमाई केली. भारतीय संघ आता आयसीसी कसोटी क्रमवारीत आपल्या परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाजवळ दाखल झाला आहे. एसएससीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा ११७ धावांनी पराभव करीत मालिकेत २-१ ने विजय मिळवला. श्रीलंकेत भारताने २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली. या मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावावर ९७ मानांकन गुणांची नोंद होती. २०११ नंतर विदेशात प्रथमच मालिका विजय साकारल्यानंतर भारताने तीन मानांकन गुणांची कमाई केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. इंग्लंड (१०२ गुण, तिसरे स्थान), पाकिस्तान (१०१ गुण, चौथे स्थान) आणि भारत (१०० गुण, पाचवे स्थान) या संघांदरम्यान केवळ तीन मानांकन गुणांचे अंतर आहे.------------------------------200 बळी घेणारा ईशांत कसोटी क्रिकेटमधील आठवा गोलंदाजईशांत शर्माने आज श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ईशांत हा भारताचा आठवा गोलंदाज ठरला. कारकिर्दीतील ६५वा कसोटी खेळणाऱ्या ईशांतने चहापानाच्या विश्रांतीनंतर मॅथ्यूजला पायचित करून कसोटी कारकिर्दीतील २००वा बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १०२व्या, विंडीजच्या गॅरी सोबर्सने ८०व्या आणि इंग्लंडच्या अॅण्ड्य्रू फ्लिंटॉफने ६९व्या सामन्यात २००वा बळी घेतला होता; पण हे तिन्ही स्पेशालिस्ट गोलंदाज नव्हते. संघामध्ये त्यांची भूमिका अष्टपैलूची होती. ईशांतपूर्वी भारतातर्फे ज्या गोलंदाजांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत, त्यांत अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजनसिंग (४१७), झहीर खान (३११), बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि श्रीनाथ (२३६) यांचा समावेश आहे.---------------------------------------------आश्विन मॅन आॅफ द सीरिजकोलंबो : विदेशात बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत असलेल्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने श्रीलंकेत विक्रमी कामगिरी करताना भारताला २२ वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.भारताच्या २-१ ने मिळविलेल्या विजयात आश्विनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने या मालिकेत १८.०९ च्या सरासरीने सर्वाधिक २१ बळी घेतले आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आश्विनने गॉलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०, पी.सारा ओव्हल मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यात सात आणि एसएससीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. त्याने या मालिकेत एक डावात पाच बळी घेण्याची कामगिरी दोनदा केली, तर सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम एकदा केला. आश्विनने श्रीलंकेत एका मालिकेत सर्वाधिक १६ बळी घेण्याचा आॅफ स्पिनर हरभजन सिंगचा विक्रम दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मोडला. आश्विनला तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एकही बळी घेता आला नाही, पण त्याने दुसऱ्या डावात चार बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २८ सामने खेळताना २८.४४ च्या सरासरीने १४५ बळी घेतले आहेत. आश्विनने विदेशात ५० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. मालिकेपूर्वी आश्विनने मायदेशात १५ कसोटी सामन्यात ९५ बळी घेतले होते, तर विदेशात त्याने १० कसोटी सामन्यांत केवळ २९ बळी घेतले होते. आश्विनने २१ बळी घेत मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ----------------------------------------------------------------ईशांतला आयसीसीने ठरविले दोषी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वादविवादात अडकलेला भारतीय गोलंदाज ईशांत शर्मा आणि श्रीलंकेचे धम्मिका प्रसाद, दिनेश चांदीमल व लाहिरू थिरिमाने यांना आयसीसीने दोषी ठरवले आहे. आयसीसीने टिष्ट्वट केले, की ईशांत शर्मा, दिनेश चांदीमल, लाहिरू थिरिमाने आणि धम्मिका प्रसाद दोषी असल्याचे आयसीसीला आढळले आहे. याबाबत कसोटी मालिका संपल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. ईशांत आणि प्रसाद यांच्यादरम्यान भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान अखेरच्या षटकात वाद झाला होता.---------------------------------धावफलकभारत पहिला डाव ३१२. श्रीलंका पहिला डाव २०१. भारत दुसरा डाव २७४. श्रीलंका दुसरा डाव : उपुल थरंगा झे. ओझा गो. ईशांत ००, कौशल सिल्वा झे. पुजारा गो. यादव २७, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. यादव ००, दिनेश चांदीमल झे. कोहली गो. ईशांत १८, अॅन्जेलो मॅथ्यूज पायचित गो. ईशांत ११०, लाहिरू थिरिमाने झे. राहुल गो. आश्विन १२, कुशल परेरा झे. रोहित गो. आश्विन ७०, रंगाना हेराथ पायचित गो. आश्विन ११, थारिंडू कौशल नाबाद ०१, धम्मिका प्रसाद झे. बिन्नी गो. आश्विन ०६, नुवान प्रदीप पायचित गो. मिश्रा ०२. अवांतर (१३). एकूण ८५ षटकांत सर्व बाद २६८. गोलंदाजी : ईशांत १९-५-३२-३, यादव १५-३-६५-२, बिन्नी १३-३-४९-०, मिश्रा १८-१-४७-१, आश्विन २०-२-६९-४.----------------------२२ वर्षांनंतर येथे विजय मिळविणे युवा संघासाठी मोठी उपलब्धी आहे. ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर विदेशात मालिका जिंकण्याची कामगिरी करताना इतिहास नोंदवला आहे. ड्रेसिंग रूममधील वातावरण शानदार असल्यामुळे विजय साकारता आला. भुवनेश्वर कुमार आणि अखेरच्या दोन सामन्यांत न खेळणारा वरुण अॅरोन यांच्यासारखे खेळाडू संघाच्या विजयासाठी प्रयत्नशील होते. हरभजनसारख्या सिनीअर खेळाडूकडून यशासाठी मदत झाली. हा सांघिक विजय आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय साकारता आला. दुखापतीतून सावरल्यानंतर पुजाराने शानदार कामगिरी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे; पण संघाच्या कामगिरीबाबत समाधानी आहे.- विराट कोहली, भारतीय कर्णधारनाणेफेक जिंकल्यानंतर पराभव स्वीकारणे निराशाजनक आहे. आमची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. प्रतिस्पर्धी संघाला १०० धावांची आघाडी बहाल केल्यानंतरही आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण भारताने चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात आम्ही ३०० पर्यंत मजल मारणे आवश्यक होते. माझ्यासह कुशल खेळपट्टीवर टिकाव धरण्यात यशस्वी ठरला असता, तर निकाल वेगळा असता. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला.-अॅन्जेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधारमाझ्यासाठी ही चांगली संधी होती. नव्या चेंडूला सामोरे जाणे आव्हान होते, पण त्यासाठी मी चांगली तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मदत मिळाली.- चेतेश्वर पुजारा, सामनावीर, भारतीय फलंदाज
-------------------------------------------------- पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचे अभिनंदननवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, देशाला संघाच्या शानदार प्रदर्शनाचा हेवा वाटतो़ मोदी यांनी टिष्ट्वट केले की, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदऩ भारताने श्रीलंकेच्या मायभूमीवर तब्बल २२ वर्षांनंतर मालिका जिंकली़ त्यानंतर पंतप्रधानांनी संघाचे अभिनंदन केले़ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे़ सोनिया म्हणाले, २२ वर्षानंतर आमच्या क्रिकेटरनी या उपलब्धीने देशाला गौरवान्वित केले आहे़------------------------------------------मालिकेत प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कोहलीने भारतातर्फे नवा विक्रम नोंदविला. २६ वर्षे ३०० दिवस वय असलेला कोहली विदेशात कसोटी मालिका जिंकणारा सर्वांत कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. कोहलीने कपिलदेवचा विक्रम मोडला. कपिलने १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका विजय साकारला होता, त्या वेळी त्याचे वय २७ वर्षे १६८ दिवसांचे होते.भारताने श्रीलंकेत २२ वर्षांनंतर मालिका विजय साकारला. यावरून संघाच्या कामगिरीची कल्पना येते. संघ आणि संघव्यवस्थापनाने क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली. या विजयासाठी विराट कोहलीचे विशेष अभिनंदन. कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी चोख बजावली.-जगमोहन दालमियामालिका विजय साकारणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. विराटचे विशेष अभिनंदन. त्याच्या नेतृत्वाखाली संघाचा पहिलाच मालिका विजय असून कर्णधार व संघासाठी ही भविष्यातील अनेक विजयांची सुरुवात असेल, अशी आशा आहे. -अनुराग ठाकूरव्ही. व्ही. एस. लक्ष्मणने टिष्ट्वट केले, की ‘मालिका विजय साकारणाऱ्या संघाचे अभिनंदन! पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर संघाने शानदार पुनरागमन केलेले बघताना आनंद झाला. चमकदार कामगिरी कायम राखा.’माजी कर्णधार बिशनसिंग बेदी म्हणाले, ‘‘भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने अखेर लंकेचा पराभव केला. भारताने पहिला कसोटी सामना कसा गमावला, हे न उलगडणारे कोडे आहे.’’हरभजनसिंग म्हणाला, ‘‘भारताने श्रीलंकेत २२ वर्षांनंतर मालिका विजय साकारण्यात यश मिळविल्यामुळे अभिमान वाटतो.’’महेंद्रसिंह धोनीनंतर संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. भारताने यापूर्वी १९९३मध्ये श्रीलंकेत मोहंमद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १-० ने मालिका जिंकला होती. तेंडुलकरने टिष्ट्वट केले, की ‘टीम इंडियाचे अभिनंदन! मालिकेत १-० ने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केले. आगेकूच करण्याची ही पद्धत आहे. विराट कोहली आणि टीम इंडियाला अनेक विजयासाठी शुभेच्छा.’माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेने मालिका विजय मिळविणाऱ्या संघाचे अभिनंदन केले. कुंबळेने टिष्ट्वट केले, की ‘मालिका जिंकण्यासाठी संघाचे अभिनंदन! विराट कोहली व संघाने शानदार कामगिरी केली.