ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ९- रोहित शर्मा आणि मनिष पांडे यांच्या तुफानी खेळीच्या बळावर आणि गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ६४ धावांनी पराभूत केले. काल झालेल्या टी-२० सराव सामन्यात सुद्धा भारताने पश्चिम ऑस्ट्रेलियाला चांगलेच नमविले होते.
आजच्या सामन्यात भारताने दिलेल्या २५० धावांच्या आव्हानाचा सामना करताना पश्चिम ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या १८५ धावांवर गारद झाला. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेरॉन मार्गनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाकीच्या फलंदाजामुळे तो अयशस्वी झाला. जेरॉन मार्गनने अर्धशतक केले, तर जॅक कार्डरने ४५ धावा केल्या.
भारताकडून फलंदाज रोहित शर्माने तुफानी खेऴी करत तीन षटकार आणि सहा चौकार लगावत ८२ चेंडूत ६७ धावा केल्या. तर, अजिंक्य रहाणे याने ४१ धावा आणि मनिष पांडेने ५८ धावा केल्याने भारताच्या धावसंख्येत मोठी भर पडली. गोलंदाज आर धवन,आर जडेजा, आर आश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर गुरकिरत सिंग आणि उमेश यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.