भारताच्या पुरूष संघाने शुक्रवारी ११ व्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तगड्या इराणवर ४२-३२ असा विजय मिळवताना सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्यांनी सर्वच्या सर्व सहा सामने जिंकले. इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली.
इराणच्या मोहम्मदने संघाचे खाते उघडले, अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्याने अखेर पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशा बरोबरीपर्यंत सामना अटीतटीचाच वाटत होता, परंतु नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या पकडी केल्या. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती.
दुसऱ्या हाफमध्ये इराणकडून तुलनेने चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. भारताला केवळ पाच गुण कमावता आले, तर दुसरीकडे इराणने १६ गुणांची कमाई केली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी सावध खेळ करत ४२-३२ असा विजय पक्का केला.