श्रीलंकेत भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सामना सुरू असताना भारतीय संघाने दुसऱ्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवले. क्रिकेटच्या सामन्यात भारताने २६७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे, परंतु पावसाने खोडा घातला आहे. तेच हॉकी ५ आशिया चषक २०२३ ( Hockey5s Asia Cup 2023.) स्पर्धेत भारताने रोमहर्षक विजय मिळवला. फायनल सामना निर्धारित वेळेत ४-४ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा निर्णय झाला अन् त्यात भारताने ४-४ ( २-०) अशी बाजी मारली.
या आशिया चषक विजयासह भारताने २०२४ मध्ये ओमान येथे होणाऱ्या Hockey5s World Cup स्पर्धेची पात्रता निश्चित केली. जुगराज सिंग ( ८मि.), मनिंदर सिंग ( १० मि.), राहिल ( १९ मि. व २६ मि.) यांनी गोल करून सामन्यात ४-४ अशी बरोबरी मिळवून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने दोन्ही संधीवर गोल केले, तर पाकिस्तानचा पहिला प्रयत्न चुकला. शूट आऊटमध्ये गुरजोत सिंग व मनिंदर सिंग यांनी गोल केले.