दुबई : बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३६-२० असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना पाकिस्तानला सहजपणे लोळवले.कर्णधार अजय ठाकूरच्या जोरावर भारताने पहिल्या सत्रात मजबूत पकड मिळवली. मध्यंतरालाच भारताने २२-९ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकालच स्पष्ट केला होता. या भल्यामोठ्या पिछाडीपुढे पाकिस्तानचे मानसिक खच्चीकरण झाले.यानंतर त्यांच्याकडून पुनरागमनाचेही प्रयत्न झाले नाही. कर्णधार ठाकूरच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारतीयांनी पाकिस्तानचा फडशा पाडला. ठाकूरने चढाईमध्ये १५ गुणांची लयलूट केली, तसेच बचावामध्ये त्याने भक्कम पकड करताना पाकिस्तानची कोंडी केली. ठाकूर एकटा पाकिस्तान संघासाठी कर्दनकाळ ठरला. (वृत्तसंस्था)
भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:04 AM