लंडन : गतचॅम्पियन भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल असून वेगवान गोलंदाजी धारदार आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केली. संगकाराने स्तंभात म्हटले आहे, ‘यंदा या स्पर्धेत आशियातील चार संघ खेळत असून भारत या विभागात सर्वांत आघाडीवर आहे. भारताने २०१३ मध्ये जेतेपद पटकावले होते आणि यंदाही या संघात जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे.’ संगकाराने म्हटले, ‘भारतीय संघ संतुलित व मजबूत आहे. वेगवान गोलंदाजी धारदार आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा वन-डे क्रिकेटमध्ये शानदार आहेत. विराट कोहली आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी पिछाडीवर सोडत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल, असा मला विश्वास आहे.’ भारतीय संघातील फलंदाजांच्या निवडीबाबत बोलताना संगकारा म्हणाला, ‘भारताने फलंदाजांची निवड करताना परंपरागतपणा जपला आहे, पण तरी त्यांची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.’ संगकाराने सांगितले, ‘अंतिम फेरीसाठी संघांची निवड करणे कठीण आहे, पण माझ्या मते उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांमध्ये आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.’ २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१४ मध्ये विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंका संघात संगकाराचा समावेश होता. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या संगकाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण २८,०१६ आंतरराष्ट्रीय धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)स्पर्धा चुरशीची होईल. चार-पाच संघ अंतिम फेरी गाठण्यास सक्षम आहेत. केवळ एक-दोन संघच वर्चस्व गाजवित असल्याचे दिवस आता संपले आहेत. अनेक देशांमध्ये क्रिकेटचा विकास झाला आहे. या सर्व संघांमध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. इंग्लंडच्या वन-डे संघाने गेल्या दोन वर्षांत चांगली प्रगती केली आहे. इंग्लंड संघ आक्रमक खेळत असून या संघात काही विश्वदर्जाचे खेळाडू आहेत.- कुमार संगकारा
भारत जेतेपद कायम राखू शकतो
By admin | Published: May 31, 2017 12:50 AM