नवी दिल्ली : सध्याचा भारतीय संघ प्रदीर्घ काळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहू शकतो, असे भाकीत शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने वर्तविले आहे. एके काळी वेस्ट इंडीज व आॅस्ट्रेलिया या संघांनी जसे जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले, तसे वर्चस्व गाजवण्याची क्षमता सध्याच्या भारतीय संघात आहे, असेही लक्ष्मण म्हणाला. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने भारतीय संघाच्या यंदाच्या मायदेशातील प्रदीर्घ सत्राची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यास उत्सुक आहे. लक्ष्मणच्या मते विराट कोहली ‘ट्रेंडसेटर’ आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘‘कसोटी खेळणाऱ्या तीन सर्वोत्तम संघांविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. भारतीय संघामध्ये अव्वल स्थान पटकावण्याची क्षमता असून संघाला प्रदीर्घ काळ हे स्थान कायम राखता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू युवा असून विदेशात खेळण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. विदेशात खेळण्याच्या अनुभवामुळे खेळाडू परिपक्व होतोे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.’’ लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘‘मायदेशात खेळताना भारतीय खेळाडूंना येथील परिस्थितीची चांगली माहिती असते. त्यामुळे खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे.’’भारताने कानपूर कसोटीत पाच गोलंदाजांसह खेळायला हवे. मुरली विजय व के. एल. राहुल यांनी डावाची सुरुवात करावी, तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असेही लक्ष्मण या वेळी म्हणाला. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून स्थान मिळविण्यासाठी सध्या संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे लक्ष्मणने सांगितले. याबाबत लक्ष्मण म्हणाला, ‘‘सर्व खेळाडू योग्य वेळी फॉर्मात असून कारकिर्दीच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांत आहेत. भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असून फलंदाजी, क्षेत्ररक्षण, फिरकी गोलंदाजी व वेगवान गोलंदाजी या सर्वंच विभागात संघ सरस आहे.’’कोहलीची प्रशंसा करताना लक्ष्मण म्हणाला, ‘‘विराट नशीबवान आहे. त्याच्याकडे परिस्थितीनुसार निवड करण्यासाठी खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. कोहली प्रेरणादायी व ‘ट्रेंडसेटर’ आहे. कारण, तो सहकाऱ्यांना चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. तो नेहमी विजयासाठी प्रयत्नशील असतो.’’ (वृत्तसंस्था)
भारतीय संघ प्रदीर्घ काळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहू शकतो : लक्ष्मण
By admin | Published: September 20, 2016 5:26 AM