मुंबई : भारतीय संघ खूप चांगला असून, त्यांच्याकडे अनेक गुणवान खेळाडू उपलब्ध आहेत. भविष्यात कधी टीम इंडियासाठी प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली, तर मी त्याबाबत नक्की विचार करेन, असे वक्तव्य आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने केले. तसेच सध्या मी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी (केकेआर) काम करीत असून, चांगले वेगवान गोलंदाज घडविण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, असे आॅस्ट्रेलियाचाच माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने सांगितले.मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका क्रुझच्या शानदार सोहळ्यात वॉर्न आणि ली उपस्थित होते. त्यावेळी दोघांना 'भारताचे प्रशिक्षक होण्यास आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर दोघांनी आपआपले मत मांडले. वॉर्न म्हणाला की, ‘माझे व्यावसायिक व वैयक्तिक वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने प्रशिक्षक म्हणून मी संघासाठी यशस्वी ठरेन की नाही, याबाबत ठामपणे सांगू शकत नाही. भारतीय संघ अत्यंत गुणवान असून, या संघासाठी काम करण्यास नक्कीच आवडेल. जर, भविष्यात कधी ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव आला तर नक्की याबाबत विचार करेन आणि संघासाठी माझे पूर्ण योगदान देईन. तसेच, ‘आयपीएल’मध्ये मी केकेआर संघाच्या गोलंदाजीवर काम करत असल्याने सध्या माझे पूर्ण लक्ष वेगवान गोलंदाज तयार करण्यावर आहे़. त्यामुळे मी प्रशिक्षक म्हणून इच्छुक नाही, असे ब्रेट ली म्हणाला. यावेळी दोन्ही दिग्गजांनी विराट कोहलीचे कौतुक केले. भारत जिंकायला हवा होता, पण...गुरूवारी झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या उपांत्य सामन्याविषयी ब्रेट ली म्हणाला की, कोहलीने मोठी धावसंख्या रचून दिल्यानंतर, ख्रिस गेलही लगेच बाद झाला. त्यावेळी भारतास जिंकण्याची पूर्ण खात्री होती. मात्र विंडिजच्या इतर फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली आणि भारतीयांकडून मोक्याच्या वेळी झालेल्या चुकांमुळे दुर्दैवाने ‘टीम इंडिया’चे आव्हान संपुष्टात आले.
संधी मिळाल्यास भारताचा प्रशिक्षक : वॉर्न
By admin | Published: April 02, 2016 1:13 AM