India vs Japan 35 - 1, Hockey: मनिंदर सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई हॉकी 5s विश्वचषक पात्रता स्पर्धेतील (Men Asian Hockey 5s World Cup Qualifier) त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली आणि जपानचा 35-1 ने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघासमोर जपान असहाय्य दिसत होता. त्यांनी पहिल्या पाच मिनिटांत सात गोल केले होते आणि त्यानंतरही त्यांनी जपानच्या संघावर दया-माया दाखवली नाही. भारताकडून मनिंदर सिंगने 10 गोल केले. त्याच्याशिवाय मोहम्मद राहिलने सात, पवन राजभर आणि गुरज्योत सिंगने प्रत्येकी पाच, सुखविंदरने चार, कर्णधार मनदीप मोरने तीन आणि जुगराज सिंगने एक गोल केला. जपानसाठी मसाटाका कोबोरीने एकमेव गोल केला.
याआधी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा ७-५ असा पराभव केला होता. या सामन्यात भारताची बाजू गुरजोतने पाच तर मनिंदर आणि राहिलने प्रत्येकी एक गोल केला. मलेशियाकडून आरिफ इशाक, कर्णधार इस्माईल अबू, मोहम्मद दिन, कमरूलजामा कमरुद्दीन आणि सियारमान मॅट यांनी गोल केले. दिवसाच्या या दोन मोठ्या विजयांसह, भारत 12 गुणांसह एलिट पूल टेबलमध्ये पाकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला, अशा प्रकारे थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. भारत शनिवारी या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.
पाकिस्तानकडून भारताचा पराभव
साखळी फेरीत भारताचा एकमेव पराभव पाकिस्तानकडून झाला. टीम इंडियाला 4-5 ने पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी झालेल्या या सामन्यात भारताकडून मनिंदर सिंग (१७वा, २९वा), गुरजोत सिंग (१२वा) आणि मोहम्मद राहिल (२१वा) यांनी गोल केले. पाकिस्तानकडून एहतेशम अस्लम (दुसरा, तिसरा), झिकारिया हयात (5वा), अब्दुल रहमान (13वा) आणि अब्दुल राणा (26वा) यांनी गोल केले. यापूर्वी टीम इंडियाने ओमानवर 12-2 असा दणदणीत विजय नोंदवला होता.