शिवाजी गोरे / ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २१ : लंडन आॅलिम्पिकचा कांस्य पदक विजेता योगेश्वर दत्त भारतासाठी शेवट गोड करण्यात अयशस्वी झाला. त्याला मंगोलियाच्या गांझोरीग मंडाखनारनकडून ०-३ गुणांनी पराभव पत्करावा लागला. कारियोका एरीनामधील कुस्ती हॉलमध्ये झालेल्या या लढतीत मॅटवर आल्यापासून योगेश्वर एवढा उत्साहीत दिसत नव्हता. त्याच्यात पूर्वीचा आत्मविश्वास सुध्दा जानवत नव्हता. कुस्ती सुरु झाल्यानंतर त्याने बचावात्मक खेळाला सुरुवात केली. दुसरीकडे गांझोरीग हा आक्रमक खेळ करून डाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातच पहिल्या राऊंडमध्ये गांझोरीगने त्याच्याविरूध्द डाव टाकण्याच्या प्रयत्नात एक गुण मिळविला. तेंव्हा सुध्दा बरोबरी करण्यात योगेश्वर अपयशी ठरला. योगेश्वरने दोन वेळा त्याच्या पटात शिरण्याचा प्रयत्न केला पण, त्याला यश आले नाही आणि गुणांची बरोबरी साधता आली नाही.
दुसऱ्या राऊंडला सुध्दा गांझोरीगने झटापटी सुरु केली त्याने योगेश्वरला कोणतीही हालचाल करू दिली नाही. योगेश्वर डाव टाकण्यासाठी प्रयत्न करीत होता पण गांझोरीग त्याला दाद देत नव्हता. त्याच वेळी गांझोरीगने पुन्हा डाव टाकताना २ दोन गुण मिळविले आणि गुणांची आघाडी ३-० केली. शेवटच्या मिनिटात योगेश्वर आक्रमक झाला पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता.
पंचांनी अंतिम शिट्टी वाजविली आणि योगेश्वरसह असंख्य भारतीयांचे या स्पर्धेतील तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. ज्या पध्दतीने आज योगेश्वर सुरुवातीपासून खेळत होता त्याच्यावरून शंका येत होती की हा पदक जिंकले की नाही.
एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकच्या रविवारी शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णनिरोप देईल, अशी देशवासीयांना अपेक्षा होती. पण त्याने निराश केले . भारताने रिओ ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.
ऑलिम्पिकसाठी भारताचे १२३ खेळाडूंचे सर्वात मोठे पथक रिओला गेले होते. भारताला किमान १० पदक मिळतील असा विश्वा, व्यक्त केला जात होता. मात्र स्पर्धेच्या शेवटी भारताच्या खात्यावर फक्त २ पदकं आहेत. एक कांस्य आणि एक रौप्य.