एंटवर्प : भारताने जरी पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिक स्पर्धेतील स्थान पक्के केले असले, तरी भारतीय कर्णधार सरदारसिंग याने त्यांचा संघ येथे पर्यटक म्हणून आला नाही, तर सध्या सुरू असलेल्या हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. हॉकी विश्व लीग सेमीफायनलमधील तीन संघांना आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे; परंतु भारताने गेल्या वर्षी इंचियोनमध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून याआधीच खेळाच्या महाकुंभासाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षक पॉल वॉन ऐस यांच्या मार्गदर्शनात युवा खेळाडू आणि नव्या व्यूहरचना अजमावण्याची एक संधी आहे. पत्रकारांनी सरदारला भारतीय संघाने या स्पर्धेत काय पणाला लावले, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ‘‘आम्ही या स्पर्धेत पर्यटक म्हणून आलेलो नाही. निश्चितच तसे नाही.’’
पर्यटक म्हणून आला नाही भारत : सरदार
By admin | Published: June 23, 2015 1:35 AM