ब्रिस्बेन : बेन कटिंगचे (९६) शानदार अर्धशतक आणि चाड सेयर्सची (३ विकेट्स) सुरेख गोलंदाजी या बळावर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या चारदिवसीय सामन्यांत भारत ‘अ’ संघावर वर्चस्व राखले आहे़ आॅस्ट्रेलिया ‘अ’ने आपल्या पहिल्या डावात ४२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली होती़ मनोज तिवारी ५० आणि बाबा अपराजित २० धावांवर खेळत होता़ भारतीय ‘अ’संघ अद्यापही २५८ धावांनी पिछाडीवर आहे़ आॅस्ट्रेलियाकडून सेयर्स याने २२ धावांच्या बदल्यात भारताच्या तीनही गड्यांना बाद केले़ त्याने सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाला १० आणि लोकेश राहुल याला ५२ धावांवर बाद केले़ राहुल लोकेश याने आपल्या खेळीत १०२ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि १ षटकार लगावला़ सेयर्स याने जीवनज्योत सिंहला (२९) बाद करीत आपला तिसरा बळी मिळविला़ अपराजित आणि तिवारी यांनी यानंतर चौथ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. त्याआधी सकाळी आॅस्ट्रेलियाने ७ बाद २८८ या धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ कटिंग (९६) आणि कॅमेरून बायस (५७) यांनी आठव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली़ कटिंगने ११४ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार आणि ४ षटकार लगावले़ अपराजितने बायसला बाद करीत ही जोडी फोडली़ भारताकडून उमेश यादव याने ८३ धावांत ५ गडी बाद केले़ (वृत्तसंस्था)
भारत ‘अ’ची निराशाजनक सुरुवात
By admin | Published: July 15, 2014 2:30 AM