- जयंत कुलकर्णी औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी रात्री झालेल्या आंतरराष्ट्रीय डायमंड चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी वर्चस्व राखताना तब्बल १४ सुवर्णपदकांची कमाई केली. त्यात मुंबईची हर्षदा पवार व औरंगाबादच्या सिद्धांत मोरे यांनीही गोल्डन कामगिरी केली.स्पर्धेत ४७ देशांतील ४५० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. सिद्धांतने चीन, यूएई या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पिछाडीवर टाकताना मेन्स क्लासिक १७५ सें.मी. सुवर्ण पदक जिंकले. मुंबईच्या हर्षदा पवार हिनेही आपला ठसा उमटवताना वूमेन फिजिक गटात सोनेरी कामगिरी केली. याच गटात भारताच्याच दीपा सप्रे हिने रौप्यपदक जिंकले.देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याचा अभिमान!भारतात जिंकलेल्या सुवर्णपदकाचे मोल हे अनमोल आहे. हे सुवर्णपदक भारतीयांसमोर, माझ्या मातीत आणि विशेष म्हणजे वडील संजय आणि आई भारती मोरे यांच्यासमोर जिंकल्याचा मला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय डायमंड चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिद्धांत मोरे याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. घरच्या प्रेक्षकांसमोर सुवर्णपदक जिंकल्यानंतर सिद्धांत मोरे याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.डायमंड चषक स्पर्धेच्या तयारीविषयी तो म्हणाला, ‘या स्पर्धेसाठी मी चांगली तयारी केली होती. स्पर्धेआधी ९१ किलो वजन होते; शरीर पीळदार दिसावे, तसेच शरीरातील नसा व स्नायू स्पष्ट दिसावे यासाठी व डायमंड चषक स्पर्धेत आपल्या गटात सहभागी होण्यासाठी मी तब्बल ११ किलो वजन कमी केले. त्यासाठी मी सलग सात दिवस पाणी वर्ज्य करून फक्त अर्ध्या मोसंबीचा रस पिऊन खडतर सराव सुरूच ठेवला. त्यामुळे माझे शरीर शुष्क झाले.तथापि, अन्य खेळाडूंनी मात्र, याचे अनुकरण करू नये. असे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसारच केले जाते.’ तो म्हणाला, ‘आज जिंकलेल्या सुवर्णपदकासोबत इलाईट प्रोकार्डचा मान मिळाला. ज्यामुळे प्रोफेशन बॉडी बिल्डरची मान्यता मिळाली. भविष्यात प्रोफेशन जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत मी सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया क्लासिक गटातील पहिला भारतीय बनण्याची मला संधी आहे. त्यासाठी मला आठ ते दहा महिने कठोर सराव करून आहारावरही लक्ष द्यावे लागणार आहे.’सिद्धांतला आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. तो म्हणाला, ‘भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आहे व शरीरसौष्ठव खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश व्हावा याची आपण प्रतीक्षा करीत आहोत आणि भविष्यातही शरीरसौष्ठव स्पर्धेत आपण खेळणार आहोत.’ सिद्धांत मोरे याने याआधी २०१५ मध्ये जपानमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे, तसेच यावर्षी त्याने पिंपरी येथे सिनिअर मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.४७ देशांतील सहभागी शरीरसौष्ठवपटू एकाहून एक सरस होते. त्यामुळे यावेळी अव्वल तीन खेळाडू निवडताना परिक्षकांची मोठी कसोटी लागली. पीळदार शरीरयष्टीने सर्व सहभागी खेळडूंनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
सुवर्ण पदकांची लयलूट करत भारताने राखले वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:15 AM