हर्षा भोगले लिहितो...मालिका सुरू होण्याआधी मी सहसा काय बोलले गेले यावर विश्वास बाळगत नसतो. अविश्वसनीय, अनिवार्य हे शब्द मालिका सुरूहोण्याआधी ऐकायला मिळतात. पण या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेआधी काही असामान्य घडले असेल तर ते मला गोंधळात टाकणारे आहे.आॅस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला, की तो किती चांगला संघ आहे, याचीच चर्चा जोरात होते. पण यंदा आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याच्या आधीपासून भारतीय संघ किती चांगला आहे, याची चर्चा रंगताना दिसते. पाहुण्या संघासाठी हा दौरा आव्हानात्मक मानला जात असला तरी माझ्या मते आॅस्ट्रेलियाचे खेळाडू संधीचे सोने करण्यात तरबेज मानले जातात. त्यांना कमी लेखून चालणार नाही.भारतीय संघ दिवसेंदिवस चांगली कामगिरी करीत आहे. सध्याचा संघदेखील बलाढ्य आहे. पण २०१३ च्या तुलनेत सध्याचा आॅस्ट्रेलियन संघ मला सरस दिसतो. भारताने इंग्लंडला सहज चारीमुंड्या चीत केले असले तरी आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक राहूनच खेळणे भारताला हितावह ठरणार आहे. कदाचित हे कुणाला पटणार नाही, पण आॅस्ट्रेलियाचा संघ पहिल्या कसोटीपासून यजमान संघावर दडपण आणू शकतो. पहिल्या डावात ४०० वर धावा काढून दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली तरी सामना गमवायचा नाही, याची खात्रीदेखील हा संघ देऊशकतो. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० आणि ४७७ धावा काढूनदेखील तो संघ भारताकडून प्रत्येक वेळी डावाने पराभूत झाला, हा अनुभव आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगलाच डोक्यात ठेवला आहे.सर्व शस्त्रानिशी सज्ज असलेल्या भारतीय संघाशी आपला सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आक्रमक पण आत्ममुग्ध नाही, तसेच त्याचे सर्व सहकारी तगडे असल्याची जाणीव पाहुण्या संघाला असेलच. हे ओळखूनच काय डावपेच आखायचे आणि कुठल्याही स्थितीत हार न मानण्याचे धोरण आॅस्ट्रेलियाने आखले असावे. पाहुण्या संघाच्या प्रशिक्षकाने खेळाडूंना तशी तंबी दिली असावी. केवळ कौशल्याच्या बळावर तुम्ही भारतात भारताला नमवू शकणार नाही. आॅस्ट्रेलियाला भारतात विजय मिळवायचा झाल्यास कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आगमनाबरोबर घाम गाळणे सुरू करा, हाच यशाचा मूलमंत्र कोचने खेळाडूंना दिला असावा.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारत ‘फेव्हरीट,’ पण...
By admin | Published: February 22, 2017 1:26 AM