दुबई : भारतीय संघ अडीच महिन्यांपासून वन डे सामने खेळला नसला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या क्रमवारीत चौथे स्थान टिकविण्यात यशस्वी ठरला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे ११२ गुण आहेत.द.आफ्रिका ११९ गुणांसह अव्वल स्थानावर कायम असून, दुसऱ्या स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाचे ११८ आणि तिसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडचे ११३ गुण आहेत. भारताने जानेवारीत इंग्लंडविरुद्ध वन डे मालिका खेळली होती. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला प्रारंभ होत आहे. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकासाठी थेट पात्रता गाठता यावी, यादृष्टीने उभय संघ चढाओढ करतील. १९७५आणि १९७९ चा विश्वविजेता विंडीज सध्या ८४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. आठव्या स्थानावर असलेल्या पाकचे त्यांच्या तुलनेत पाच गुण जास्त आहेत. बांगला देश ९२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. विंडीजने आपल्या मैदानावर पाकविरुद्ध १५ वन डे जिंकले. १३ सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. विंडीजकडे पाकला मागे टाकण्याची संधी आहे; पण त्यासाठी त्यांना तिन्ही सामने जिंकावेच लागतील. दुसरीकडे पाकने तिन्ही सामने जिंकल्यास बांगला देशच्या बरोबरीने त्यांचेही ९२ गुण होतील. (वृत्तसंस्था)
भारत वन डेत चौथ्या स्थानावर
By admin | Published: April 06, 2017 4:21 AM