ब्रिस्बेन : मनीष पांड्येच्या (७७) शानदार अर्धशतकी खेळानंतरही भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव आॅस्टे्रलिया ‘अ’ विरुद्ध पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी २३० धावांवर संपुष्टात आला. मिशेल स्वेप्सन याने ७८ धावांत ४ बळी घेऊन भारतीय संघाला हादरे दिले. भारताचा डाव संपुष्टात आणल्यानंतर आॅस्टे्रलियाने दमदार सुरुवात करताना दिवसअखेर ६ षटकांत बिनबाद २५ धावा काढल्या. कॅमेरोन बॅनक्रॉफ्ट (१०) आणि जो बर्न्स (१२) हे खेळपट्टीवर टिकून आहेत. भारत ‘अ’ संघाचा कर्णधार नमन ओझाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखिल हेरवाडकर आणि फैझ फझल यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची शानदार सलामी दिली. मात्र, यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने भारताचा डाव मर्यादित राहिला. ३ बाद ११८ धावा अशा स्थितीतून भारतीयांनी संयमी खेळ करीत ३ बाद १८८ अशी मजल मारली. या वेळी भारतीय पुनरागमन करणार, अशी शक्यता होती. मात्र, पुन्हा एकदा फलंदाजांनी कच खाल्ल्याने भारत ‘अ’ संघाने ४२ धावांत इतर ७ फलंदाज गमावले. मनीष पांड्येने एकाकी झुंज देताना ७६ चेंडूंत १३ चौकार व एका षटकारासह आक्रमक ७७ धावा काढल्या. तर, त्याआधी हेरवाडकर (८९ चेंडंूत ३४ धावा) आणि फझल (१२३ चेंडूंत ४८ धावा) या सलामीवीरांनी संयमी फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, इतर फलंदाजांना चांगली खेळी करण्यात अपयश आल्याने भारत ‘अ’चा डाव २३० धावांमध्ये संपुष्टात आला. (वृत्तसंस्था)
भारत ‘अ’ २३० धावांत गारद
By admin | Published: September 09, 2016 12:21 AM