नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे झालेल्या विशेष आलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी ठसा उमटवताना तब्बल ८५ सुवर्ण पदकांसह ३६८ पदकांची घसघसीत कमाई केली.१४ ते २१ तारखेदरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारताने १५४ रौप्य तसेच १२९ कांस्य पदकेही जिंकली. भारतीय पथकामध्ये एकूण २८४ खेळाडूंचा समावेश होता.भारताने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली ती पॉवरलिफ्टिंगमध्ये. यात भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध करताना २० सुवर्ण, ३३ रौप्य आणि ४३ कांस्य अशी एकूण ९६ पदकांची लयलूट केली. रोलर स्केटिंगमध्ये भारताने जिंकलेल्या ४९ पदकांत १३ सुवर्ण, २० रौप्य आणि १६ कांस्यपदकांचा समावेश आहे.सायकलिंग प्रकारात भारताने ११ सुवर्णपदकांसह ४५ पदके आपल्या नावे केली. अॅथलेटिक्स प्रकारामध्ये भारतीय खेळाडूंच्या वाट्याला एकूण ३९ पदके आली. यामध्ये ५ सुवर्ण, २४ रौप्य आणि १० कांस्यपदकांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताला ३६८ पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:08 AM