मुंबई : भारतीय संघ आॅस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आगामी सुदीरमन कप विश्व मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री क्रिकेट क्लब इंडियाचे मानद आजीवन सदस्यत्व प्रदान करीत सिंधूचा गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना सिंधू म्हणाली, ‘‘माझ्या मते या स्पर्धेत आम्हाला चांगली संधी आहे. मिश्र सांघिक स्पर्धा असून पुरुष व महिलांना चांगला खेळ करावा लागेल.’’भारतीय संघाचे मानांकन ९ असून ग्रुप वन डीमध्ये डेन्मार्क व इंडोनेशियासह भारताला स्थान मिळाले आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा २१ ते २८ मे या कालावधीत रंगणार आहे. भारतीय संघ सांघिक स्पर्धेतील यापूर्वीच्या टप्प्यामध्ये नवव्या स्थानावर होता. भारतीय संघाची भिस्त विश्व मानांकनामध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या व रिओ आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या सिंधूच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कारण अव्वल महिला बॅडमिंटनपटू व लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकविजेती सायना नेहवालने कौटुंबिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकच महिला खेळाडू मिश्र सांघिक स्पर्धेत खेळणार असल्यामुळे सायनाच्या अनुपस्थितीचा काही परिणाम होणार नाही, असेही सिंधू म्हणाली.सिंधूची जागतिक मानांकनामध्ये दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. सिंधू म्हणाली, ‘‘सध्या मानांकनामध्ये मी चौथ्या स्थानी असून वर्षाअखेरपर्यंत तिसऱ्या स्थानी राहील, अशी मला आशा आहे.’’(वृत्तसंस्था)
भारताला सुदीरमन कप जिंकण्याची चांगली संधी
By admin | Published: May 15, 2017 1:31 AM