जकार्ता : भारताला अॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश असलेली ही स्पर्धा जगभरातील प्रमुख शहरात आयोजित करण्यावर भर दिला आहे. येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले को यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारतात डायमंड लीगच्या अयोजनाच्या शक्यतेबाबत चर्चा केली.
को म्हणाले,‘ डायमंड लीग किंवा विश्व दर्जाच्या अनेक स्पर्धा युरोपपर्यंत मर्यादित राहिल्या. आमच्याकडे सुविधा उपलब्ध असल्या तरी दिल्ली, टोकियो, बीजिंग या आशियाई शहरात आयोजन व्हावे याची काळजी घेत आहोत. ’दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले को यांनी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आयोजनावर भर देत असल्याचे सांगून डायमंड लीग आयोजनाचा करार सध्या एक वर्षे शिल्लक असून जगभरातील शहरात ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले,‘ पुढच्या वर्षी दोहा येथे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन , २०२० मध्ये टोकियो शहरात आॅलिम्पिकचे आयोजन आणि चीनच्या नानजिंग शहरात विश्व इन्डोअर अॅथलेटिक्सचे आयोजन होणार आहे. अॅथलेटिक्सच्या दृष्टीने पुढील चार- पाच वर्षे आशियावर केंद्रित राहतील. चीन आणि कतार हे देश डायमंड लीगचे यजमानपद भूषवित आहेत.’
१९८० आणि १९८४ च्या आॅलिम्पिकमधील १५०० मीटर दौडमध्ये सुवर्ण असलेले को हे हिमा दास आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर चांगलेच प्रभावी झाले आहेत. हिमाने विश्व ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण तर चोप्राने २०१६ च्या अंडर २० चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत सुवर्ण जिंकले आहे. को म्हणाले, ‘हिमाच्या कामगिरीने मला फार प्रभावित केले. मी त्यावेळी स्टेडियममध्ये होतो. भारतासाठी हे शुभसंकेत आहेत. अॅथलेटिक्स भारतीय लोकसंख्येवर प्रभाव टाकताना दिसत आहे.’
२०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुलच्या यशस्वी स्मृतींना उजाळा देत को यांनी दरदिवशी स्टेडियमवर उसळणाऱ्या गर्दीची प्रशंसा केली. खेळांना जगभर लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने भारताचे योगदान मोलाचे ठरू शकते.प्रायोजक आणि प्रसारक भारतीय उपखंडात अधिक असल्याने अॅथलेटिक्सला संपन्न बनविण्यासाठी आशियात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनास आयएएएफ प्राधान्य देत असल्याचे को यांनी सांगितले.काय आहे डायमंड लीग...डायमंड लीगचे आयोजन एकूण १४ टप्प्यात करण्यात येते. सहभागी होणारे आघाडीचे खेळाडू मोठ्या रकमेचे पुरस्कार विजेते ठरतात, शिवाय त्यांना रँकिंग गुण मिळतात. स्पर्धेची सुरुवात २०१० मध्ये झाली. या आयोजनाचा हेतू गोल्डन लीगचे स्थान घेणे तसेच आयोजन युरोप बाहेर नेणे हा होता. या प्रायोजकांसोबतच्या कराराचे नूतनीकरण होण्याआधी नव्या शहरात आयोजनाच्या चर्चेला वेग आला आहे.