CWG 2022: एकीकडे भारतीय खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करत असताना, दुसरीकडे मात्र भारताची स्टार धावपटू हिमा दासचं (Hima Das) पदकाचं स्वप्न भंगलं आहे. अवघ्या ०.०१ सेकंदाच्या फरकामुळे हिमा दासला अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आलेला नाही. प्रयत्नांची पराकाष्टा करूनही ०.०१ सेकंद इतक्या अटी-तटीच्या शर्यतीत भारताचं पदक हुकल्याचं सांगितलं जात आहे.
२२ वर्षीय स्टार धावपटू हिमा दास हिच्याकडून भारताला पदकाची आशा होती. मात्र, महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठता आली नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीत अन्य धावपटूंना अटी-तटीची टक्कर दिली. हिमा दासने आपले सर्वोत्तम देत अंतिम फेरीत धडकण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला यश आले नाही. अवघ्या ०.०१ सेकंदाच्या फरकामुळे दुसऱ्या उपांत्य फेरीत हिमा दासला पराभव स्वीकारावा लागला.
हिमाने दुसऱ्या उपांत्य फेरीत २३.४२ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरी केवळ ०.०१ सेकंदाच्या फरकाने गमावली. नामिबियाची क्रिस्टीन एम्बोमा आणि ऑस्ट्रेलियाची एला कोनोली अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. महिलांच्या २०० मीटर प्रकारात तीन उपांत्य फेरीचे सामने होते. ज्यापैकी अव्वल दोन धावपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, भारताच्या कुस्तीपटूंनी पदकांची अक्षरश: बरसात केली. आधी अंशू मलिकने रौप्यपदक पटकावले. त्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया या तिघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर कांस्यपदका साठी झालेल्या सामन्यांमध्ये १२५ किलो वजनी गटात भारताच्या मोहित ग्रेवालने विजय मिळवला. त्याने आरोन जॉन्सनला पराभवाचं पाणी पाजलं. तर दुसरीकडे भारताची दिव्या काकरा हिनेही कांस्यपदकाची कमाई केली.