सोशल मीडियाच्या या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे डॉली चायवाला. या डॉलीच्या प्रसिद्धीमुळे भारतीयहॉकी संघाच्या खेळाडूंना अपमानास्पद वागणूक मिळाली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्याहॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंगने एक धक्कादायक प्रकार सांगितला. एका विमानतळावर असताना चाहत्यांनी भारताच्या हॉकी संघाकडे दुर्लक्ष करत डॉली चायवालासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. सद्य प्रकार पाहून आम्हालाच अस्वस्थ वाटले, असे हार्दिकने सांगितले.
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये कांस्य पदक जिंकून भारतीय संघाने ४१ वर्षांनंतर पदक जिंकण्याची किमया साधली होती. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील संघाने यंदा झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देखील शानदार कामगिरी करत पदकाचा बचाव केला. विमानतळावर मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले ते धक्कादायक होते... मी, मंदीप सिंग आणि इतर पाच-सहा जण तिथे होतो. डॉली चायवाला देखील तिथेच होता. तिथे उपस्थित असणारी मंडळी डॉलीसोबत सेल्फी घेत होती. पण, कोणीच आम्हाला किंमत दिली नाही. आम्ही केवळ एकमेकांकडे पाहत राहिलो आणि अस्वस्थ वाटले, असे हार्दिक सिंगने एका पॉडकास्टवर बोलताना सांगितले.
दरम्यान, अनोख्या पद्धतीने चहा बनवणाऱ्या डॉली चायवालाला अचानक प्रसिद्धी मिळाली. त्याने बिल गेट्स यांनाही चहा दिला आहे. बिल गेट्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर डॉली एक स्टार बनला.
ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने स्पेनचा पराभव करुन पुन्हा एकदा कांस्य पदक जिंकले. हार्दिक सिंग पुढे म्हणाला की, हरमनप्रीत सिंगने १५० हून अधिक तर मंदीपने १०० पेक्षा जास्त गोल केले आहेत. एक खेळाडू म्हणून पद आणि पैसा ही एक बाब असते. पण, तुम्ही खेळत असताना प्रेक्षक तुमच्या खेळीला दाद देत असतात त्यापेक्षा अभिमानाची बाब कोणती नसते. अलीकडेच भारताने चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला.