- सचिन कोरडे
गोवा : नुकताच महाराष्ट्र राज्याचा सर्वाेच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ पटकाविणा-या ललिता बाबर आणि संजीवनी जाधव या लांब पल्ल्याच्या धावपटूंची निवड १४ व्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत या दोन ‘महाराष्ट्रीयन एक्सप्रेस’वर संपूर्ण देशाच्या नजरा असतील. भारतीय संघाचे पथक प्रमुख म्हणून गोव्याच्या परेश कामत यांची निवड झाली आहे. त्यांनी सुद्धा ललिता आणि संजीवनीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
कामत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले चीनमधील ग्युईयांग सिटी येथील किन्गझेन येथे १५ मार्च रोजी ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघटनेकडून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात २० वर्षांखालील आठ आणि महिला व पुरुष गटातील ८ असा एकूण १६ सदस्यीय संघ चीन दौºयावर जाणार आहे. या स्पर्धेसाठी जोरात तयारी सुरु आहे. या खेळाडूंकडून देशाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. महिला खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा अधिक समावेश आहे. साता-याच्या ललिता हिने सुद्धा आपले लक्ष्य राष्ट्रकुल नसून आशियाई स्पर्धा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आशियाई स्पर्धांसाठी तिची विशेष तयारी सुरु आहे.
दरम्यान, परेश कामत हे गोवा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव तसेच माजी धावपटू आहेत. जानेवारी महिन्यात फोंडा (गोवा) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेच्या आयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांनी विविध स्पर्धांत व्यवस्थापकीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पुणे व भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई ग्रांप्री आणि आशियाई मैदानी स्पर्धेत त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून केलेले काम उल्लेखनीय ठरले होते.
बॅँकॉक येथील आशियाई युवा मैदानी स्पर्धेसाठी परेश कामत हे भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही होते. व्यवस्थापन आणि तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांना दीर्घ अनुभव आहे. या सर्वांच्या जोरावर त्यांची चीन दौºयासाठी निवड करण्यात आली आहे. परेश कामत यांचा देशातील आघाडीच्या खेळाडूंसोबत जवळचा परिचय आहे. आपल्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.