अॅडलेड : वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरीची आशा आहे. मार्च-एप्रिल महिन्यात मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन संघाचा योग्य समतोल साधण्यास प्रयत्नशील आहे. भारताला वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-४ ने पराभव स्वीकारावा लागला. आता टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने भारताला या दौऱ्याचा सकारात्मक शेवट करण्याची संधी आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर उभय संघांना टी-२० विश्वकप स्पर्धेची तयारी करण्याची संधी आहे. भारतीय संघ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अधिक खेळत नाही. वर्ष २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात टी-२० ला स्थान देण्यात आल्यानंतर भारताने आतापर्यंत केवळ ५७ सामने खेळले आहेत. त्यात पाच विश्वकप स्पर्धेदरम्यान खेळलेल्या २८ सामन्यांचा समावेश आहे. भारताने पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून आजतागायत भारताने केवळ २९ द्विपक्षीय सामने खेळलेले आहे. त्यातही भारताची कामगिरी विशेष चांगली नाही. भारताने १४ सामने जिंकले असून १५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. टी-२० मालिकेत पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्ट्या पाटा असल्यामुळे फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या तुलनेत आॅस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना संधी असते. कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे लढतीत अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो पहिल्या टी-२० लढतीला मुकणार आहे. या मालिकेत सर्वांची नजर सलामीवीर शिखर धवनच्या फलंदाजीवर केंद्रित झाली आहे. त्याने वन-डे मालिकेत सूर गवसल्याचे संकेत दिले असून, तो रोहित शर्माच्या साथीने डावाची सुरुवात करणार असल्याचे निश्चित आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असून, युवराज सिंगला २०१४ मध्ये बांगलादेशात खेळल्या गेलेल्या विश्वकप टी-२० स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतर आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सिडनीमध्ये शतकी खेळी करणाऱ्या मनीष पांडेला टी-२० संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे युवराज, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. परिस्थितीनुसार फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोलंदाजांची निवड करणे कर्णधार धोनीसाठी आव्हान ठरणार आहे. पाच स्थानासाठी धोनीकडे रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, हरभजनसिंग, आशिष नेहरा, उमेश यादव, ऋषी धवन, गुरकिरत मान, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय संघ सध्या युवा खेळाडूंना संधी देत आहे. त्यामुळे आक्रमक अष्टपैलू व फॉर्मात असलेल्या पांड्यावर सर्वांची नजर आहे; पण त्याला प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या बुमराहच्या कामगिरीवर धोनीने समाधान व्यक्त केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये चांगला मारा करणाऱ्या बुमराहला आणखी एक संधी मिळू शकते. उमेश यादवला लय गवसलेली नाही. त्याने वन-डे मालिकेत खोऱ्याने धावा बहाल केल्या आहेत. नेहराने सोमवारी नेट््समध्ये कसून सराव केला. अन्य सीनिअर खेळाडूंसह त्याला पुनरागमनाची संधी मिळाली तर फिरकीपटूंसाठी दोन स्थान शिल्लक असतील. आॅस्ट्रेलियातील वातावरणात गोलंदाजी व फलंदाजीच्या तुलनेत जडेजासाठी क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू आहे. त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. अखेरच्या स्थानासाठी आश्विन आशावादी आहे. युवराज व रैनाचा पर्याय असल्यामुळे धोनी हरभजनच्या तुलनेत आश्विनला संधी देण्याची शक्यता अधिक आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत प्रथमच आॅस्ट्रेलिया संघ अंतिम ११ खेळाडूंबाबत निश्चित नाही. टी-२० क्रिकेटमध्ये स्मिथच्या स्थानी अॅरोन फिंच संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फिरकीपटू नॅथन लियोनला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. लेगस्पिनर कॅमरन बायस आणखी एक पर्याय आहे. (वृत्तसंस्था)१सुरेश रैनाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१०-१४ दरम्यान ५ डावांत फक्त ७० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या २६ आहे. २आर. आश्विन भारताकडून टी-२० मध्ये २०१२ ते १४ दरम्यान ५ डावांत १४१ धावा देऊन ४, तर भुवनेश्र्वर कुमारने २०१३-१४ दरम्यान २ लढतींमध्ये ४२ धावांत ४ विकेट घेतल्या आहेत. ३युवराजसिंगने २००७ ते १४ दरम्यान ६ डावांत २४७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी नाबाद ७७ धावांची आहे. यामध्ये त्याने १७ षटकांत ठोकले आहेत. यामध्ये त्याने ३ अर्धशतके केली आहेत.४महेंद्रसिंह धोनीने २००७ -१४ दरम्यान ९ डावांत १८८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ४८ आहे. त्याने ६ षटकार मारले आहेत. हेड टू हेडभारत आणि आॅस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २००७ ते २०१४ दरम्यान एकूण ९ टी-२० सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर आॅस्ट्रेलियाने ४ सामन्यांमध्ये विजय नोंदविला आहे.दडपण न बाळगता खेळणार : रैनाभारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पत्करावा लागलेला पराभव आता इतिहास असून टीम आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत दडपण न बाळगता खेळणार असल्याचे मत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केले. उभय संघांदरम्यान तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेत चमकदार सुरुवात महत्त्वाची ठरणार असल्याचे रैनाचे मत आहे.सराव सत्रानंतर बोलताना रैना म्हणाला, ‘‘दडपण न बाळगता खेळण्याचा आमचा निर्धार आहे. वन-डे मालिका इतिहास असून आता नव्याने सुरुवात करण्यास उत्सुक आहे. वर्चस्व गाजवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही चांगली कामगिरी करू. आॅस्ट्रेलिया संघ युवा असून अखेरच्या सामन्यात विजय मिळविल्यामुळे आम्हाला सूर गवसला आहे.युवराज व रैनाला रोखण्याची रणनीती : फिंचवन-डे मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत सहभागी होत असलेले भारताचे अनुभवी खेळाडू युवराजसिंग व सुरेश रैना यांचे आव्हान पेलण्यास सज्ज आहे, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा टी-२० संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने व्यक्त केला. फिंच म्हणाला, ‘‘भारताने टी-२० संघात अनुभवी खेळाडूंना पाचारण केले आहे. विश्वकप स्पर्धेपूर्वी सर्व संभाव्य खेळाडूंची चाचणी घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे. युवराजसिंग व सुरेश रैना यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंसाठी आमच्याकडे रणनीती आहे. सीनिअर खेळाडूंच्या समावेशामुळे संघावर दडपण येत नाही. जर अनेक युवा खेळाडूंचा समावेश असला तर दडपण येते. कुठल्या परिस्थितीत कसे खेळायचे, याची सीनिअर खेळाडूंना कल्पना असते.
भारताला चमकदार कामगिरीची आशा
By admin | Published: January 26, 2016 2:44 AM