Paris Olympics 2024: मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू आणि सरबजोतनं शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधलाय. याआधी रविवारी मनू भाकरनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचं खातं उघडलं होतं. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक जिंकवून देणाऱ्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करत आज दुसऱ्या 'ब्राँझ मेडल'वर नाव कोरलं. या कामगिरीत आज तिच्यासोबत होता सरबजोत सिंग. एकेरीत निराशा पदरी पडलेली असतानाही, सरबजोत नव्या उमेदीनं रेंजवर उतरला आणि दोघांनी मिळून जबरदस्त विजय साकारला. भारतीय जोडीनं साऊथ कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन या जोडीचा १६-१० असा पराभव केला. मनू भाकरच्या 'डबल धमाक्या'मुळे भारतात आनंदोत्सव साजरा होतोय.
ब्रिटीश वंशाचे भारतीय खेळाडू नॉर्मन प्रिचार्ड यांनी १९०० सालच्या ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर धावणे आणि २०० मीटर अडथळा स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. परंतु हा विजय स्वातंत्र्यापूर्वीचा होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर हा अभिमानाचा क्षण आहे, आम्ही आनंदी आहोत पण ही कठीण लढाई होती, असं सरबजोत सिंगने म्हटलंय. मनूची इच्छा पूर्ण झाली असून २ पदक जिंकल्यानं तिचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक अन् अभिनंदन
ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवणाऱ्या मनू भाकर आणि सरबजोत सिंगचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. दोघांनाही शाबासकी देत, भारतासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.