वेलेंशिया : देविंदर वाल्मीकीने ५७ व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर भारताने सहा देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत शनिवारी अर्जेंटिनाला ३-३ असे बरोबरीत रोखले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरलेला भारतीय संघ मध्यंतरापर्यंत १-३ ने पिछाडीवर होता, पण रमणदीप सिंग (४७ वा मिनीट) आणि वाल्मीकी (५७ वा मिनीट) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या स्पर्धेत भारताला जर्मनी व न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला, तर एकमेव विजय आयर्लंडविरुद्ध मिळवता आला. भारताची साखळी फेरीतील अखेरची लढत आज, रविवारी स्पेनविरुद्ध होणार आहे. मध्यंतरापर्यंत अर्जेंटिनाने वर्चस्व गाजवले. पहिला क्वार्टरच्या अखेरच्या क्षणी मतायस पैरेदेसने गोल नोंदवित अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला १६ व्या मिनिटाला भारताने बरोबरी साधली. रुपिंदर पाल सिंगने स्ट्रोकवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. अर्जेंटिनातर्फे गोंजालो पिलेटने पेनल्टी कॉर्नरवर, तर लुकास विलाने मैदानी गोल नोंदवित संघाला मध्यंतरापर्यंत ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्वार्टरमध्ये दानिश मुज्तबाच्या पासवर रमणदीपने ४७ व्या मिनिटाला भारतातर्फे दुसरा गोल नोंदवला. ५७ व्या मिनिटाला देविंदरने शानदार गोल नोंदवित संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर एक मिनिटाने भारतीय गोलकिपर पी.आर. श्रीजेशने अर्जेंटिनाचा पेनल्टी कॉर्नर थोपवित संघाला दिलासा दिला. (वृत्तसंस्था)
भारताने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले
By admin | Published: July 03, 2016 4:29 AM