ब्रिस्टल : सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला संघ उद्या (बुधवारी) महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. या लढतीत विजय मिळवित उपांत्य फेरीचा मार्ग सुकर करण्यास भारतीय संघ प्रयत्नशील आहे.भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात करताना इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला ११५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.त्याचप्रमाणे सलग चार लढतींमध्ये विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. आॅस्ट्रेलिया संघही विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. पण सरस नेटरनरेटच्या आधारावर आॅस्ट्रेलियाची स्थिती मजबूत आहे. आॅस्ट्रेलिया संघाला इंग्लंडविरुद्ध केवळ तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी होती. पण आता भारताला साखळी फेरीतील अखेरच्या दोन लढतींमध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बलाढ्य संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या लढतीत विजयासाठी २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५८ धावांत संपुष्टात आला. एक वेळ १७ व्या षटकात भारताची ६ बाद ५६ अशी अवस्था झाली होती, पण दीप्ती शर्माने ६० धावांची खेळी करीत भारताला शंभरचा पल्ला ओलांडून दिला. झूलन गोस्वामी ४३ धावा काढून नाबाद होती.आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी चांगली नाही. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४१ पैकी केवळ ८ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला. गेल्या वेळी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत कर्णधार मिताली राजने ८९ धावांची खेळी केली होती आणि भारताने या लढतीत ५ गडी राखून विजय मिळवला होता. भारतातर्फे स्मृती मानधना, पूनम राऊत व हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्मात आहेत, तर दीप्ती व मिताली यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत संघात परतलेल्या शिखा पांडेने तीन बळी घेतले होते. शिखा म्हणाली, ‘आम्हाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल.’ (वृत्तसंस्था)
भारत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक
By admin | Published: July 12, 2017 12:35 AM