पश्चिम व्हँकुव्हर : हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीआधी झालेल्या सामन्यात भारताच्या महिला हॉकी संघाने चिलीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात मोक्याच्या वेळी खेळ उंचावत चिलीने भारतीय महिलांचा धडाका रोखला. चिलीने आक्रमक खेळताना सकारात्मक सुरुवात केली. १८ व्या मिनिटालाच आॅगस्टिना वेनेगासने वेगवान गोल करीत चिलीला १-० असे आघाडीवर नेले. दरम्यान, या गोलआधी भारताच्या रेणुका यादवला ग्रीन कार्ड दाखविण्यात आले होते. यानंतर, भारतीय खेळाडूंनी बचावावर अधिक लक्ष दिले. त्याच वेळी, ३५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अनुपा बार्लाने यशस्वी कामगिरी करताना महत्त्वपूर्ण गोल नोंदवला आणि भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. बरोबरी साधल्यानंतर भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. आक्रमक पवित्रा घेत भारतीयांनी चिलीला काही वेळ दडपणाखाली आणले. याचा फायदा घेताना लगेच एका मिनिटानंतर वंदना कटारियाने शानदार मैदानी गोल करीत भारताला २-१ असे आघाडीवर नेले. या वेळी भारत बाजी मारणार, असे चित्र होते. परंतु, चिलीने ५३ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत सामना बरोबरीत सोडवला. पुन्हा एकदा वेनेगासने महत्त्वपूर्ण गोल करताना चिलीचा पराभव टाळला. यानंतर, भारताचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध होईल. या सामन्यानंतर एक एप्रिलपासून हॉकी वर्ल्ड लीग दुसऱ्या फेरीसाठी भारताच्या मोहिमेची सुरुवात होईल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारतीय महिलांची सलामी उरुग्वेविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)
भारताने विजयाची संधी सोडली
By admin | Published: March 27, 2017 1:02 AM