मिरपूर : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशवर ८ गडी राखून मात करत आपणच आशियाचा शेर असल्याची डरकाळी भारताने फोडली. विराट कोहलीची संयमी खेळी आणि शिखर धवनचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर आलेल्या धोनीने सहा चेंडूत तडकावलेल्या २० धावांच्या जोरावर भारताने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. पावसाच्या व्यत्ययानंतर पंधरा षटकांच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलाच्या साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर संघाला १५ षटकात ५ बाद १२० धांवाचा डोंगर उभा करून दिला. मात्र हे आव्हान भारताने लिलया पेलले. ८ गड्यांनी हरवत भारताने बांगलादेशला त्यांच्याच भूमित नमविले.
गोलंदाजांच्या ‘कमाल’ कामगिरीनंतर फॉर्मशी झगडणाऱ्या शिखर धवनच्या ‘धमाल’ अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने शेर-ए- बांगलावर ‘शेरदिल’ विजय नोंदवला. हायहोल्टेज स्वरूप प्राप्त झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. या विजयानंतर भारताने आशिया चषक टी-२० चषकावर नाव कोरले. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेत भारताने अपराजीत कामगिरी केली. बांगलादेशचे ५ बाद १२० धावांचे आव्हान भारतीय संघाने १३.५ षटकांत गाठले. शिखर धवनने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीने उत्कृष्ट साथ दिली. विराट ४१ धावांवर नाबाद राहिला. धवन परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार धोनीने दणादण षटकार ठोकले. षटकार ठोकूनच त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने ६ चेंडूंत २० धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीवीर रोहित शर्मा (१) बाद झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन (६०) आणि विराट कोहली (नाबाद ४१) या जोडीने चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा पाया रचला गेला. त्यावर धोनीने ‘विजयी’ कळस चढवला. बांगलादेशकडून अल-अमिन हसन आणि तस्कीन अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, अष्टपैलू मेहमुदुल्लाने केलेल्या तडाखेबंद नाबाद ३२ धावांच्या बळावर बांगलादेशने भारतापुढे ५ बाद १२० धावांचे लक्ष्य उभारले होते. या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे उशिरा सुरू झालेला हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला. मेहमुदुल्लासोबत शब्बीर रहमान याने नाबाद ३२ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशला शतकी धावसंख्या गाठता आली. त्याआधी, भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
(वृत्तसंस्था)