लंडन : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाकडे शुक्रवारी आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीविरुद्ध एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवण्याची चांगली संधी होती, पण भारताने ती गमावली. भारताने या लढतीत एकवेळ ३-१ अशी आघाडी घेतली होती, पण अखेर लढत ३-३ ने बरोबरीत संपली. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला भारताने ३-१ अशी आघाडी घेतली होती, पण जर्मनीने ३६ व ५७ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवित भारताचे संस्मरणीय विजय मिळवण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले. भारतातर्फे व्ही. रघुनाथ, मनदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला तर गत चॅम्पियन जर्मनीतर्फे टॉम ग्रामबुशआणि जोनास गोमोल यांनी गोल नोंदवले. भारताने पहिल्या हाफमध्ये वर्चस्व राखले तर जर्मनीने दुसऱ्या हाफमध्ये शानदार पुनरागमन केले. भारतातर्फे दुसऱ्या हाफमध्ये बचाव फळीची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याचा लाभ घेत जर्मनीने पराभव टाळण्यात यश मिळवले. गोलकिपर श्रीजेशने दोनदा चांगला बचाव केला, पण ५७ व्या मिनिटाला जर्मनीला नववा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर मारलेला फटका गोललाईनमध्ये भारतीय बचावपटूच्या शरीराला लागला. नियमानुसार प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. त्यावर गोमोलने बरोबरी साधणार गोल नोंदवला. विजयाची संधी गमावल्यामुळे भारतीय खेळाडू निराश झाले होते. भारतीय संघाची यानंतरची लढत शनिवारी चौथे मानांकन प्राप्त ब्रिटनसोबत होणार आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय संघाने गमावली जर्मनीवर विजयाची संधी
By admin | Published: June 11, 2016 6:23 AM