डर्बी : फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्यानंतर एकता बिष्टने केलेल्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ९५ धावांनी लोळवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ बाद १६९ धावांची मजल मारल्यानंतर पाकिस्तानचा ७४ धावांत खुर्दा पाडून दणदणीत विजयाची नोंद केली. या शानदार विजयासह भारतीय महिलांनी ३ सामन्यांतून ६ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय महिलांनी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या एकूण १० एकदिवसीय लढती जिंकल्या आहेत़काउंटी मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, पाकिस्तानच्या नियंत्रित माऱ्यापुढे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. एक वेळ भारताच्या पराभवाची शक्यताही दिसू लागली होती. परंतु, एकताने सर्व गणित बदलताना भारताची विजयी मालिका कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली. धावांचा पाठलाग करताना भारताने पाकिस्तानला जबर धक्के देताना त्यांचा २४ धावांतच अर्धा संघ बाद केला. येथेच पाकिस्तानचा पराभव स्पष्ट झाला होता. या वेळी पकड आणखी घट्ट करताना भारतीय महिलांनी पुढील ४८ धावांत उर्वरित ५ बळी घेत पाकिस्तानला नमवले. एकताने भेदक मारा करताना १० षटकांत केवळ १८ धावा देत ५ बळी घेत पाकिस्तानची दाणादाण उडवली. मानसी जोशीनेही ९ धावांत २ बळी घेत एकताला चांगली साथ दिली. तत्पूर्वी, सध्या फुल फॉर्ममध्ये असलेली भारताची फलंदाजी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मात्र अपयशी ठरली. अडखळत्या सुरुवातीनंतर भारतीय महिलांना समाधानकारक मजल मारण्यात यश आले ते मुंबईकर पूनम राऊतच्या दमदार फलंदाजीमुळे. पहिल्या दोन सामन्यांत आक्रमक फलंदाजी करणारे स्मृती मानधना (२) आणि कर्णधार मिताली राज (८) स्वस्तात बाद झाल्यानंतर पूनमने खंबीरपणे लढताना ७२ चेंडूत ५ चौकारांसह ४७ धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा (२८) आणि यष्टिरक्षक सुषमा वर्मा (३३) यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करत भारताला समाधानकारक मजल मारून दिली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक भारत : ५० षटकांत ९ बाद १६९ धावा (पूनम राऊत ४७, सुषमा वर्मा ३३; नशरा संधू ४/२६) वि.वि. पाकिस्तान : ३८.१ षटकांत सर्व बाद ७४ धावा (साना मीर २९, नाहिदा खान २३; एकता बिष्ट ५/१८, मानसी जोशी २/९)
दस का दम, भारताकडून पाकिस्तान ९५ धावांनी पराभूत
By admin | Published: July 03, 2017 1:21 AM