हांगझाऊ : भारताने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत १९५१ पासून आतापर्यंतची सर्वाधिक ८१ हून अधिक पदके जिंकली आहेत. जकार्ता येथे २०१८ साली भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह ७० पदकांची कमाई केली होती.
भारताने यंदा १०० पदकांचे लक्ष्य ठेवले असून, बुधवारपर्यंत १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी एकूण ८१ पदके जिंकली आहेत. स्पर्धेत अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. भारताने बुधवारी भालाफेक, तिरंदाजी आणि पुरुष ४ बाय ४०० रिले शर्यत अशा तीन स्पर्धांमध्ये सुवर्ण कमाई केली. भारताने १९५१ मध्ये ५१ पदके जिंकली. त्यानंतर ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पूर्वीपेक्षा अधिक चमकला! ८१ पदकांसह, आपण आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट पदकतालिका साजरी केली. खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचा हा पुरावा आहे. आपले प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्या प्रवासावर प्रकाश टाकते. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आतापर्यंत काय झाले होते?
१९८२ मध्ये नवी दिल्ली आशियाडमध्ये १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये १७, तर १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती. n१९९० मध्ये भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. त्यावेळी भारताकडे केवळ २३ पदके होती. १९९८ पासून कामगिरी सुधारली.
२००६ मध्ये प्रथमच ५० हून अधिक पदके जिंकली होती. भारताकडे तिरंदाजी, मॅरेथाॅनसह इतर स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याची संधी आहे.