बंगळुरु : अंतिम सामन्याचे स्वरुप आलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताच्या महिला संघाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर दमदार फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिला संघाचा ९ विकेट्सने फडशा पाडला आणि या दमदार विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असा कब्जा केला.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा निर्णायक सामना पुर्णपणे एकतर्फी ठरवताना भारताच्या महिलांनी एकहाती वर्चस्व राखले. पाहुण्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना न्यूझीलंडचा निर्णय त्यांच्यावर उलटवला आणि पाहुण्यांचा डाव ४१ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आणला.या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी आक्रमक फटकेबाजी करताना न्यूझीलंडच्या आव्हानातली हवाच काढली. स्मृती मंधना ३ चौकार खेचून १३ धावा काढून लगेच परतल्याने भारताला तिसऱ्याच षटकांत १८ धावांवर पहिला झटका बसला. यावेळी किवी पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र थिरुष कामिनी आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अभेद्य १०३ धावांची विजयी भागीदारी रचताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कामिनीने ७८ चेंडूत १३ चौकार ठोकताना नाबाद ६२ धावा चोपल्या. तर दीप्तीने ७८ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ४४ धावांची संयमी खेळी खेळली. किवींकडून केवळ मोर्ना नेल्सनला एकमेव बळी मिळाला.तत्पूर्वी, झुलान गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी अचूक मारा करताना प्रत्येकी २ बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. एकता बिस्त आणि हरमनप्रीत कौर यांनी देखील प्रत्येकी १ बळी घेत पाहुण्यांचा डाव ४१ षटकांत ११८ धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून कर्णधार सुझी बेट्स (४२), अॅना पिटरसन (१८) आणि सोफिया डेविन (१८) यांनाचे केवळ दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले. (वृत्तसंस्था)
भारताने किवींची केली शिकार
By admin | Published: July 09, 2015 1:00 AM