भारताच्या पुरुष व महिला संघाने पॅरिस येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात जिंकले कांस्यपदक, अतनू दास, तुषार शेळके आणि धीरज बोमादेवारा यांनी स्पॅनिश टीमवर ६-२ असा विजय मिळवला. महिला संघानेही रिकर्व्ह सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले. भजन कौर, सिमरनजीत कौर आणि अंकिता भकत यांनी मेक्सिकोवर ५-४ असा विजय मिळवला. ४-४ अशा बरोबरीनंतर शूट ऑफमध्ये भारताने २७-२५ अशी बाजी मारली.
पुरुष गटात महाराष्ट्राच्या अमरावतीच्या तुषार शेळकेचा समावेश आहे. तुषारने शिवाजी महाविद्यालयातून BA शिक्षण घेतले आहे. भारतीय पुरुष संघाने या यशाचे श्रेय प्रशिक्षक बाएक वूंग की यांना दिले. 'मी पाहिलेल्या प्रशिक्षकांपैकी हे सर्वोत्तम आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेत अन् सराव करताना आपलं माईंडसेट कसं काम करतं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानुसार आमचा सराव करून घेतला आणि आम्ही दिवसेंदिवस चांगली कामगिरी करत गेलो. ते स्वतः एक तिरंदाज असल्याने त्यांना याची जाण आहे,''असे दास म्हणाला.