ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 12 - एकमेव कसोटीत भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात 4 बाद 159 धावा कुटत आपली आघाडी 458 धावांवर पोहोचवली आणि दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बांगलादेश संघाने चौथ्या दिवसाअखेर 3 बाद 103 धावा केल्या आहेत. बांगलादेश संघाला विजयासाठी आणखी 356 धावांची गरज आहे तर भारताला सात बळींची आवशकता आहे. सध्या बांगलादेश कडून मेहमुद्दुला 9 आणि शाकिब अल हसन 21 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून तमीम इक्बाल 3, सौम्य सरकार 42 आणि मोमिनूल हक 27 धांवा काढून बाद झाले. आर. अश्विनने दोन तर जाडेजाने एक बळी घेतला.
दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (7), लोकेश राहुल (10) झटपट बाद झाले. मात्र चेतेश्वर पुजारा (नाबाद 54), विराट कोहली (38), अजिंक्य रहाणे (28) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 16) यांनी झटपट फलंदाजी करत भारताची आघाडी साडेचारशेच्या पलिकडे पोहोचवली.
भारताच्या 687 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने मुशफिकूर रहिमच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात चिवट फलंदाजी करत 388 धावांपर्यंत मजल मारली. मात्र बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 299 धावांनी मागे राहिल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने पाहुण्यांना फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी कालच्या 6 बाद 322 धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चिवट फलंदाजी केली. शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार मुशफिकूर रहिमने तळाच्या फलंदाजांच्या साथीने बांगलादेशच्या धावसंख्येत अजून 66 धावांची भर घातली. त्याबरोबरच भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक फटकावणारा मुशफिकूर बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला. एक बाजू लावून धरणारा मुशफिकूर 127 धावांवर बाद झाल्यावर बांगलादेशचा डाव 388 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उमेश यादवने तीन, तर अश्विन आणि जडेजाने दोन गडी बाद केले.