ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. ११ - पाकिस्तान विरुद्धचा सामना क्रिकेटच्या मैदानावर असो वा हॉकीच्या प्रेक्षकांना नेहमीच थरारक खेळाची अनुभूती मिळते. विजयासाठी दोन्ही संघ मैदानावर जीव ओतून खेळ करतात. कारण पराभव कोणालाच मान्य नसतो. क्रीडा नैपुण्याबरोबरच दोन्ही संघातील खेळाडूंसाठी मैदानावर भावनात्मक लढाईही असते.
२५ व्या अझलन शहा कप हॉकी स्पर्धेमध्ये भारताचा सामना येत्या मंगळवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील पदकाच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक आहे. पाचवेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणा-या भारताने मागच्यावर्षी कास्यपदक पटकावले होते.
सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघामध्ये अनेक युवा हॉकीपटू आहेत. कॅनडावर मिळवलेल्या ३-१ या विजयानंतर राऊंड रॉबिन लीगमध्ये सहागुणांसह भारत तिस-या स्थानी आहे. पाकिस्तानने स्पर्धेत आतापर्यंत फक्त कॅनडावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया सलग तीन विजयांसह नऊ गुणांसह आघाडीवर आहे तर, न्यूझीलंड आठ गुणांसह दुस-या स्थानी आहे.