नागपूर : आयसीसी टी-२० विश्वचषकात १५ मार्च रोजी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर ग्रुप-२ मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी फलंदाजांना पूरक खेळपट्टी बनविण्याचे निर्देश व्हीसीए प्रशासनाला देण्यात आल्याचे कळते.मागच्या वर्षी येथे २५ नोव्हेंबर २०१५ ला भारत-द. आफ्रिका यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळविण्यात आला. तीन दिवसांत आटोपलेल्या या सामन्यानंतर सामनाधिकारी जेफ क्रो यांनी खेळपट्टीला खराब रेटिंग दिले होते.रविचंद्रन आश्विनच्या ११ बळींमुळे भारताने हा सामना १२४ धावांनी जिंकला होता. त्यानंतर आयसीसीच्या पिच समितीने व्हीसीएला तंबी दिली होती. या खेळपट्टीवर फलंदाजी आणि गोलंदाजी यात साधर्म्य नसल्याचे आयसीसीने नमूद केले होते. या सामन्यासाठी मधली खेळपट्टी वापरली जाणार आहे. शनिवारी सायंकाळी स्कॉटलंड- हाँगकाँग या सामन्यादरम्यान जोरदार पाऊस झाला होता; पण मंगळवारी पावसाची भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. ४४ हजार ९०० प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममधील सर्वच तिकिटे विकली गेली आहेत. याआधी येथे झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात भारताने लंकेला २५ धावांनी पराभूत केले होते. यंदाच्या टी-२० विश्वचषकात या स्टेडियमवर सहा पात्रता सामने खेळविण्यात आले आहेत. भारत-न्यूझीलंड लढतीशिवाय पुरुष गटाचे आणखी दोन सामने आयोजित होणार असून, महिला गटाचे दोन सामनेदेखील खेळविले जातील. (क्रीडा प्रतिनिधी)सेंटर विकेट वापरणार!मंगळवारी भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान फलंदाजांना पूरक खेळपट्टी पाहायला मिळेल, असे संकेत व्हीसीए सूत्रांनी दिले आहेत. टी-२० विश्वचषकादरम्यान खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असायला हवी, असे स्पष्ट निर्देश आयसीसीने दिल्याचे या सूत्रांनी सांगितले. हा टी-२० सामना आहे, कसोटी नव्हे. आम्ही निर्देशांचे तंतोतंत पालन करीत आहोत. या सामन्यासाठी रंजन मदुगुले सामनाधिकारी असून, रिचर्ड इलिंगवर्थ, कुमार धर्मसेना, मराइस इरॅसमस आणि नायजेल लाँग हे मैदानी पंच आहेत.
भारत- न्यूझीलंड सामन्यात फलंदाजांना पूरक खेळपट्टी!
By admin | Published: March 14, 2016 12:56 AM