ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 19 - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विशाखापट्टणम येथे नियोजित असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्याबाबत अनिश्चिततेचे सावट आहे. हंगामी पावसाला झालेली सुरुवात आणि खेळपट्टीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हामुळे पाचवा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथून हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
सतत होत असलेल्या पावसामुळे विशाखापट्टणम येथील मैदानावरील खेळपट्टी खराब झाली आहे. राजस्थान आणि आसाम यांच्यात झालेल्या रणजी लढतीदरम्यान याचा प्रत्यय आला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 17 फलंदाज बाद झाले होते. पावसामुळे येथील खेळपट्टी व्यवस्थित तयार करता आली नसल्याचे आंध्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जी. गंगाराजू यांनी सांगितले.
"पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर येथील खेळपट्टी पुन्हा तयार करण्यात आली. पण पावसामुळे खेळपट्टी व्यवस्थित तयार करता आली नाही. खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी बीसीसीआय बुधवारी क्युरेटर किंवा निरीक्षक पाठवण्याची शक्यता आहे. खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर क्युरेटर येथील खेळपट्टी पाचवा एकदिवसीय सामना आयोजित करण्यासाठी आहे की नाही याचा अहवाल देतील," असे गंगाराजू म्हणाले.
मात्र क्युरेटरनी खेळपट्टी सामना आयोजित करण्यासाठी अयोग्य घोषित केल्यास विशाखापट्टणम येथे पाचवा एकदिवसीय सामना आयोजित होणार नाही. "विशाखापट्टणम येथील पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या आयोजनाबाबत सध्या माझ्याकडे फार माहिती नाही. पण आमच्याकडे सामन्याच्या आयोजनासाठी काही पर्यायी ठिकाणे तयार आहेत. त्यामुळे सामना आयोजित करण्यासाठी आम्हाला अडचणी येणार नाहीत," असे बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांनी सांगितले.