नवी दिल्ली : भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारत-पाक मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याच्या पाकच्या मागणीवर त्यांनी हे उत्तर दिले.पाकला जशास तसे उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, हे पाकने आधी ठरवून टाकावे.’’ पीसीबीने याआधी भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याची मागणी केली होती.भाजपा खासदार ठाकूर म्हणाले, ‘‘द्विपक्षीय मालिका दोन संघांपुरती मर्यादित असते, तर विश्वचषकात विविध देशांचे संघ सहभागी होतात. यंदा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी पाक संघ एक आहे. भारत सरकार पाक संघालादेखील सुरक्षा पुरविणार आहे. माझ्या मते, सर्व पात्र संघांनी विश्वचषकात सहभागी व्हायला हवे. भारत सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. एखाद्या संघाला काही त्रास असेल, तर तो संघ निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.’’पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी याआधी आयसीसीएला पाठविलेल्या प्रस्तावात भारत-पाक मालिका तटस्थ स्थळी घेण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय यापुढे पाक सरकार घेईल. आमच्या सरकारने संमती न दिल्यास पाक संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही, असेही शहरयार यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था) विश्वचषक टी-२०चे यशस्वी आयोजन करण्यास बीसीसीआय कटिबद्ध आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल. याआधीदेखील आम्ही विश्वचषक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. कोणताही संघ किंवा खेळाडूला भारतात असुक्षित वाटेल, यामागे कुठलेही कारण नाही.- अनुराग ठाकूर
भारतात खेळाडूंना धोका नाही : ठाकूर
By admin | Published: February 11, 2016 3:27 AM