नवी दिल्ली : ‘फूलराणी’ सायना नेहवाल हिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्मक सुरुवात करताना झेक प्रजासत्ताकच्या टेरेजा स्वाबिकोवाविरुद्ध बाजी मारली. पाठदुखीमुळे टेरेजाने सामना अर्धवट सोडल्याने सायनाला पुढील फेरीत प्रवेश करताना फारशी अडचण झाली नाही. त्याचप्रमाणे, पुरुष गटामध्ये एच. एस. प्रणॉय आणि युवा लक्ष्य सेन यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारीत विजयी सलामी दिली.
सायनाला पहिल्या गेममध्ये झुंजार खेळ करावा लागला. दुखापतींमुळे सायनाला गेल्या वर्षी अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली. अटीतटीचा झालेला पहिला गेम २२-२० असा जिंकल्यानंतर पुढील गेममध्ये सायनाने पहिला गुण जिंकत आघाडी मिळविली. मात्र, यावेळी पाठदुखी उफाळल्याने टेरेजाला खेळणे कठीण झाले आणि तिने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सायना पुढील फेरीत भारताच्याच मालविका बनसोडविरुद्ध भिडेल. मालविकाने सामिया इमाद फारुखीला २१-१८, २१-९ असे नमवले.
प्रणॉयने स्पेनच्या पाब्लो अबियानचे आव्हान २१-१४, २१-७ असे परतावले. पुढील फेरीत प्रणॉय मिथुन मंजुनाथविरुद्ध खेळेल. मिथुनने फ्रान्सच्या अर्नाड मर्कल याचा २१-१६, १५-२१, २१-१० असा पाडाव केला. गेल्या महिन्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या लक्ष्य सेनने एकतर्फी झालेल्या सामन्यात इजिप्तच्या एधम हातेम एगामाल याचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडविला.
अश्विनी- रेड्डी यांची आगेकूचमहिला दुहेरी गटात भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी या अव्वल जोडीने अपेक्षित सुरुवात केली. दोघींनी भारताच्याच जनानी अनंतकुमार आणि दिव्या आर. बालासुब्रमण्यम यांचा २१-७, १९-२१, २१-१३ असा पराभव केला.
सायनाचा झुंजार खेळसायनाने विजयी सलामी दिली असली, तरी तिला कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. यामुळे पुढील सामन्यांत तिला खेळ उंचवावा लागेल.