नवी दिल्ली : एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि शिव थापा (६० किलो) या भारताच्या स्टार मुष्टियोद्ध्यांनी आपआपल्या वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करताना इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे.पाच वेळची विश्वविजेती आणि आशियाई चॅम्पियन मेरी कोमने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारताच्याच बीना देवी हिला सहजपणे नमवले. मणिपूरच्या ३५ वर्षीय मेरी कोमने एकतर्फी झालेल्या लढतीमध्ये ५-० असा दबदबा राखताना बाजी मारली. महिलांच्या अन्य लढतीमध्ये सरितादेवी हिनेही अपेक्षित कामगिरी करताना थायलंडच्या पीमविलाई लाओपीम हिचा ४-१ असा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.दुसरीकडे पुरुषांच्या गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या शिव थापा याने उझबेकिस्तानच्या शेरबेक राखमातुलीव याला धक्का दिला. सावध सुरुवात केलेल्या शिवने अखेरच्या तीन मिनिटांमध्ये आपला हिसका दाखवताना परीक्षकांच्या गुणांच्या जोरावर बाजी मारली. उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताच्याच मनीष कौशिकविरुद्ध होईल. मनीषने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपीन्सच्या चार्ली सुआरेज याला पराभूत केले. विशेष म्हणजे गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत शिव आणि मनीष आमनेसामने आले होते. त्यामध्ये मनीषने बाजी मारली असल्याने शिवपुढे कडवे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
इंडिया ओपन मुष्टियुद्ध : शिव थापा, मेरी कोम उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:40 AM