लंडन : पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना आयसीसीने उभय संघांमधील सामना मोठ्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरत असल्यामुळे कधीकधी हेतूपुरस्सरपणे असे करावे लागते, असे म्हटले आहे.आयसीसी ट्रॉफी २०१७ साली इंग्लंडमध्ये १ ते १८ जून या कालावधीत होईल. बुधवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. भारत आणि पाकला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले असून गत चॅम्पियन भारतीय संघ ४ जून रोजी एजबेस्टन येथे पाकविरुद्ध खेळेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात स्थान दिल्याविषयी विचारताच आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ‘भारत-पाक सामना आयसीसी स्पर्धेचा गाभा असतो. ही लढत आयोजित करण्यावर आम्ही भर देत असतो. जगभरातील प्रेक्षक या लढतीची प्रतीक्षा करीत असतात. यामुळे आमच्या स्पर्धेची देखील लोकप्रियता आणखी वाढत असल्याने भारत-पाक सामना आमच्यासाठी विशेष असतो. तथापी रिचर्डसन यांनी ड्रॉ काढताना अफरातफर झाल्याच्या आरोपाचा इन्कार केला. ते पुढे म्हणाले, ‘ड्रॉ काढताना कुणावरही अन्याय केला जात नाही. विविध संघांचे रँकिंग लक्षात घेऊन आम्ही त्यांना समान गुण देतो. पूल संतुलित व्हावा, हे आमचे मुख्य उद्दिष्ट असते. योग्य पद्धतीने संघांना स्थान देण्यात येत असल्याने कुठल्याही प्रकारची अफरातफर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ (वृत्तसंस्था)दोन्ही शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्याची आयसीसी स्पर्धेची ही पाचवी वेळ आहे. भारत आणि पाकमध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. टीव्हीवरदेखील अब्जावधी लोक हा सामना पाहतात, हा आमचा अनुभव आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारत-पाक संघांना एकाच गटात ठेवण्यात आल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. प्रसारणकर्ते आणि प्रायोजकांना लाभ पोहोचविण्यासाठी आयसीसी असे काम हेतूपुरस्सरपणे करीत असल्याचा आरोप झाला होता. आयसीसीच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी प्रथमच ही कबुली दिली आहे.
भारत-पाकला एकाच गटात ठेवणे आवश्यक : आयसीसी
By admin | Published: June 03, 2016 2:33 AM