- सुनील गावसकर लिहितात...भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना खेळाडंूमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना भिनलेली असते आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना ती अधिक जोमाने उफाळून येते. सध्या सीमेवर तणावाची स्थिती बघता पूर्वीच्या तुलनेत यावेळच्या भारत-पाक लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू मात्र लढतीच्या हाईपमध्ये वाहवत न जाता दडपण झुगारून खेळण्यास सज्ज असतील, हे मात्र निश्चित. या लढतीमुळे ‘हीरो’ किंवा ‘झिरो’ ठरू शकतो, याची प्रत्येक खेळाडूला कल्पना आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या अनुभवाचा विचार करता भारतीय संघाचे पारडे थोडे वरचढ भासते. मिसबाह, युनूस आणि आफ्रिदी या खेळाडूंचा समावेश नसल्यामुळे पाक संघाला अनुभवाची उणीव भासत आहे. पाकिस्तानने युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्या उत्साहाच्या जोरावर ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या लढतीच्या निमित्ताने पाकच्या युवा खेळाडूंना छाप सोडण्याची चांगली संधी लाभली आहे. सराव सामन्यांत पाक संघाची कामगिरी चांगली ठरल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ आपल्या प्रशिक्षकांच्या अनावश्यक वादासह स्पर्धेत दाखल झाला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर त्यासाठी हा वादच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात येईल. व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे हा वाद विसरून चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतील, पण ड्रेसिंग रुममधील अनिश्चितता मैदानावरील चुकीपेक्षा जास्त त्रासदायक असते. यावेळी भारताचा वेगवान मारा चांगला आहे. सर्वंच गोलंदाज अचूक व वेगवान मारा करीत आहेत. ढगाळ वातावरणात गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल; पण पाकच्या गोलंदाजांनाही त्याचा लाभ मिळेल. भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अधिक अनुभव आहे. युवराज फिट असेल तर रहाणेला बाहेर बसावे लागेल. भारतीय संघाची निवड करताना संघव्यवस्थापनाला एक प्रश्न मात्र भेडसावणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीला खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला आहे का ? या महत्त्वाच्या लढतीत त्याला संधी देण्याची जोखीम पत्करता येईल का? (पीएमजी)
भारत-पाकिस्तान लढतीची रंगतच न्यारी
By admin | Published: June 04, 2017 6:01 AM