ढाका : १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. भारताने २००१ मध्ये विजेतेपद पटकावले होते; तर २००९ मध्ये भारताला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानने २००९ मध्ये जेतेपद, तर २०११ मध्ये कांस्यपदक पटकाविले होते.पाकिस्तानने आपल्या गटात चिनी तैपैईला ६-१, तर चीनला ६-० असे पराभूत केले. हॉँगकॉँगला १४-० असे पराभूत करीत गटात अव्वल स्थान पटकाविले. भारताला मात्र पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून ४-५ असे पराभूत व्हावे लागले. हा सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रोमांचक सामना ठरला; मात्र या पराभवातून सावरत भारतीय संघाने ओमानला ११-० असे पराभूत करीत खाते उघडले.भारतीय आघाडीपटू इबुंगो सिंग व दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी चार गोल केले आहेत. कर्णधार निलाम संजीप जेस व गोलरक्षक पंकज कुमार यांनीही आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत-पाक उपांत्य फेरीत
By admin | Published: September 29, 2016 4:26 AM