एंटवर्प : वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. या सामन्यात कडवे आव्हान सादर करण्याच्या इराद्याने खेळण्याची इच्छा भारतीय खेळाडूंनी व्यक्त केली. या सामन्याचा निकाल पूल पोझिशनवर प्रभाव टाकणारा ठरणार आहे.भारताने पहिले दोन्ही सामने काठावर जिंकले तर पाकविरुद्धची कालची लढत २-२ ने बरोबरीत सोडविण्यात यश आले. आॅस्ट्रेलियाने पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने सहज जिंकले हे विशेष. भारतीय संघाचे नवे कोच पॉल वान एस यांनी आपला संघ विश्वविजेत्यांना कडवे आव्हान देईल, अशी आशा व्यक्त केली. आॅस्ट्रेलियाने मागच्या वर्षी सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकून हॅट्ट्रिक साधली. काही युवा खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत खेळविणे आणि काही खेळाडू जखमी असल्याने भारताकडे काही डावपेच खेळण्याची चांगली संधी आहे. इंचियोन आशियाडचे सुवर्ण जिंकून भारताने रियो आॅलिम्पिकची तिकीट आधीच पक्के केले आहे. काही संघांना मात्र आॅलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी ही अखेरची संधी असेल. भारताची चिंता आघाडीची फळी ही आहे. काल पाकविरुद्ध वारंवार संधी मिळूनही आघाडीच्या फळीच्या अपयशामुळेच सामना बरोबरीत सुटला होता. भारताचे तीन सामन्यांत ७ गुण आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विजय मिळवला तरच आॅस्ट्रेलिया पहिल्या स्थानापासून वंचित राहील. भारत ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाच्या शक्यतेबाबत कोच पॉल वान एस. म्हणाले, आॅस्ट्रेलिया रँकिंगमध्ये अव्वल तर भारत नवव्या स्थानावर आहे. कर्णधार सरदारसिंग म्हणाला, की सामन्यागणिक आमच्या खेळाडूंचा खेळाचा स्तर सुधारत आहे. अझलन शाह चषकात आॅस्ट्रेलियावर ४-२ ने मिळवलेल्या विजयातून प्रेरणा घेऊ. युवा खेळाडूंच्या बळावर आम्ही एकसंघ होऊन खेळत आहोत.
आॅस्ट्रेलियाला आव्हान देण्यास भारत सज्ज
By admin | Published: June 28, 2015 1:45 AM