एंटवर्प : सलामी लढतीत फ्रान्सविरुद्ध ३-२ ने विजय मिळविणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये मंगळवारी दुसऱ्या लढतीत मानांकनामध्ये खालच्या स्थानी असलेल्या पोलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या लढतीत भारताला बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.भारताने शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत अखेरच्या क्षणी गोल नोंदवून विजय मिळविला; पण या सामन्यात भारतीय बचाव फळी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. फ्रान्सच्या खेळाडूंनी अनेकदा भारताचा बचाव भेदत गोलक्षेत्रात मुसंडी मारली. सरदारसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक असून, त्यासाठी त्यांना मंगळवारी चमकदार कामगिरी करावी लागेल. पोलंड जागतिक मानांकनामध्ये भारताच्या तुलनेत आठ स्थानांनी पिछाडीवर आहे; पण त्यांच्यात धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय संघ पोलंडला कमी लेखण्याची चूक करणार नाही. फ्रान्सप्रमाणे पोलंड संघातही काही आक्रमक फॉरवर्डचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत पोलंडने आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली होती. भारतीय संघाला दोन अनुभवी ड्रॅग फ्लिकर व्ही. आर. रघुनाथ व रूपिंदर पाल सिंग यांची उणीव भासत आहे. रघुनाथ दुखापग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर आहे. त्याच्या स्थानी समावेश करण्यात आलेला रूपिंदर स्पर्धेपूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. पहिल्या लढतीत तो सहभागी झाला नव्हता. यापूर्वीच आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविल्यामुळे भारतासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची नाही. त्याचप्रमाणे विश्व लीग फायनलसाठी यजमान असल्यामुळे भारतीय संघ यापूर्वीच पात्र ठरला आहे.(वृत्तसंस्था)
भारत चमकदार कामगिरी करण्यास सज्ज
By admin | Published: June 23, 2015 1:36 AM