नवी दिल्ली : ‘भारत ऑलिम्पिक यजमानपदासाठी सज्ज आहे. २०३० सालचे युवा ऑलिम्पिक व २०३६ सालच्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताकडून कोणतीही कसर सोडली जाणार नाही,’ असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘राइजिंग भारत’ संमेलनामध्ये ठाकूर यांनी भारताच्या ऑलिम्पिक यजमानपदाचा विश्वास व्यक्त केला.
ठाकूर म्हणाले की, ‘भारत २०३० युवा ऑलिम्पिक व २०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी सज्ज आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताकडे मोठी युवा शक्तीही आहे. खेळांसाठी भारताहून मोठी बाजारपेठ नाही.’
उद्घाटन समारंभासाठी रशिया, बेलारुसला ‘नो एंट्री’जिन्हेवा : रशिया व बेलारुसचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होऊ शकणार नाहीत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बुधवारी ही माहिती दिली. ऑलिम्पिक उद्घाटन समारंभ २६ जुलैला रंगेल. या शानदार उद्घाटन समारंभात हजारो खेळाडू सीन नदी ते ऐतिहासिक आयफेल टॉवरपर्यंत बोटींमधून जातील. साधारणपणे ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातील परेड स्टेडियममध्ये रंगते. मात्र, यंदा हा सोहळा वेगळ्या स्वरूपात रंगेल. रशिया व बेलारुसचे खेळाडू नदीच्या किनाऱ्यावरून हा सोहळा पाहतील, असे आयओसीने म्हटले.