फतुल्लाह : आयपीएलच्या लिलावामध्ये चांगली किंमत मिळालेल्या युवा ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने शनिवारी नामिबियाचा १९७ धावांनी पराभव केला आणि आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. डावखुऱ्या पंतने ९६ चेंडूंना सामोरे जाताना १११ धावांची खेळी केली. पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद ३४९ धावांची मजल मारली. अनमोलप्रीत सिंग (४१), सरफराज खान (७६) आणि अरमान जाफर (६४) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. अनमोलप्रीतने तीन बळीही घेतले. मयंग डागरने तीन आणि वाशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले. नामिबिया संघाचा डाव ३९ षटकांत १४९ धावांत संपुष्टात आला. पंतला शनिवारी आयपीएलच्या लिलावामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने १ कोटी ९० लाख रुपयाला करारबद्ध केले. अंडर-१९ संघाचा कर्णधार व सलामीवीर ईशान किशनला गुजरात लॉयन्सने ३५ लाख रुपयाला करारबद्ध केले. गेल्या लढतीत २४ चेंडूंत ७८ धावा फटकावणाऱ्या पंतने शनिवारी आपल्या खेळीत १४ चौकार व २ षटकार ठोकले. सरफराजने ७६ चेंडूंना सामोरे जाताना ७६ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकभारत ५० षटकांत ६ बाद ३४९ (ऋषभ पंत १११, सरफराज खान ७६; फ्रित्झ कोएत्झी ३-७८). नामिबिया ३९ षटकांत सर्वबाद १५२ (निको डाविन ३३; मयंक डागर ३-२५, अनमोलप्रीत सिंग ३-२७).
भारताची उपांत्य फेरीत धडक
By admin | Published: February 07, 2016 3:21 AM