नवी दिल्ली : द. आफ्रिकेचा भारत दौरा कसोटी मालिकेदरम्यान अग्निपरीक्षेचा ठरणार असल्याचे भाकीत द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने व्यक्त केले आहे. आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा ७२ दिवसांचा दीर्घ दौरा करणार असून या मालिकेत चार कसोटी, पाच वन डे आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील. पहिला सामना मोहालीत ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्मिथ म्हणाला,‘हा दौरा आमच्यासाठी सर्वांत कठीण आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देणारा असेल. भारत दौऱ्यापाठोपाठ आम्हाला इंग्लंड दौरा करायचा आहे. भारतातील चारही कसोटी सामने सहजसोपे राहणार नाहीत. भारतीय भूमित सामने खेळायचे असल्याचे तितकाच प्रवासही करावा लागेल. येथील परिस्थिती एकदम वेगळी आहे. हा दौरा निर्विघ्न पार पडावा यासाठी मी प्रार्थना करीत आहे.’ स्मिथ पुढे म्हणाला, ‘भारता दौरा यशस्वी झाल्यास आम्ही इंग्लिश दौऱ्यातही शानदार कामगिरी करू शकू.’ स्मिथच्या मार्गदर्शनात आफ्रिकेने २००८ आणि २००९ मध्ये भारताविरुद्ध दोन कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्या होत्या. आमचा संघ २००६ पासून विदेशात कसोटी मालिकेत पराभूत झालेला नाही. त्यामुळेच यंदा कठोर मेहनत घेत गांधी-मंडेल चषक जिंकावाच लागेल.’ या मालिकेसाठी स्मिथने आपल्या खेळाडूंना अनेक टीप्स दिल्या. विशेषत: क्वींटन डिकॉक याला स्वत:ला सिद्ध करण्याचा सल्लाही दिला. कॉकला बांगला देश दौऱ्यातील खराब कामगिरीसाठी संघाबाहेर काढण्यात आले होते.
भारत मालिका ही अग्निपरीक्षा : स्मिथ
By admin | Published: September 12, 2015 3:06 AM